ब्रिटनमध्ये आता प्रत्येकाला व्हावे लागेल लष्करात भर्ती

या देशांतही कठोर नियम

ब्रिटनमध्ये आता प्रत्येकाला व्हावे लागेल लष्करात भर्ती

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सर्वसाधारण निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. जर, हुजूर पक्ष सत्तेवर आल्यास ते सर्व तरुणांना देशाच्या लष्करात सेवा देणे अनिवार्य करेल, असे त्यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार, १८ वर्षांच्या तरुणांना १२ महिन्यांची सेवा देणे बंधनकारक असेल.

ब्रिनटमध्ये ४ जुलै रोजी सर्वसाधारण निवडणुका होत आहेत. हुजूर पक्षाच्या मतदारांना खूष करण्यासाठी ही घोषणा केल्याचे बोलले जात आहे तर, विरोधी मजूर पक्षांनी याला नाटक म्हटले आहे. असे झाल्यास ६५ वर्षांनंतर पुन्हा एकदा ब्रिटनमध्ये लष्करी सेवा आणि प्रशिक्षण आवश्यक होईल. बीबीसीच्या अहवालानुसार, १९४९ ते १९६० या कालावधीत ब्रिटनमध्ये १७ ते २१ वर्षांच्या तरुणांना १८ महिन्यांपर्यंत लष्करात सेवा करणे बंधनकारक होते. अशा तरुणांना चार वर्षांपर्यंत लष्करात राखीवही ठेवले जात होते.

आता काय योजना?

हुजूर पक्षानुसार, आता १८ वर्षांवरील तरुणांना दोन पर्याय मिळतील. हे तरुण प्रत्येक वीकेंडला लष्कराचे प्रशिक्षण घेऊ शकतील. त्यांना एका वर्षात २५ दिवस लष्करी प्रशिक्षण मिळेल. हे तरुण राखीव ३० हजार रिक्त पदासाठीही अर्ज करू शकतील. अर्थात १८ वर्षांच्या तरुणांना नॅशनल आर्मी सर्व्हिसमध्ये सेवा देणे बंधनकारक असेल. बीबीसीने सांगितल्यानुसार, तरुणांकडे न करण्याचा पर्याय नसेल. जर कोणी सेवा देण्यास किंवा प्रशिक्षण घेण्यास नकार देत असेल तर त्याच्यावर अनेक प्रतिबंध लागतील.

कोणकोणत्या देशात लष्करात सेवा देणे बंधनकारक?

रशिया– १८ ते २७ वर्षांच्या तरुणांना १२ महिन्यांपर्यंत सेवा देणे बंधनकारक. नकार देणाऱ्या तरुणांना दंड आणि तुरुंगवास.

कोरिया– उत्तर व दक्षिण कोरिया या दोन्ही देशांमध्ये लष्करीसेवा देणे बंधनकारक. उत्तर कोरियात १७-१८ वर्षांच्या तरुणांना लष्करात भर्ती केले जाते. पुरुषांना १० वर्षे तर महिलांना सात वर्षे सेवा देणे बंधनकारक. दक्षिण कोरियात पुरुषांना तीन सेनांपैकी कोणत्याही एका सेनेत सेवा देणे बंधनकारक. लष्करात २१ महिने, नौदलात २३ महिने आणि हवाई दलात २४ महिने सेवेचा कालावधी.

इस्रायल– पुरुषांसाठी दोन वर्षे आठ महिने आणि महिलांनी दोन वर्षे लष्करात सेवा देणे बंधनकारक

ब्राझील– येथे प्रत्येक पुरुषाला किमान १२ महिन्यांपर्यंत लष्करात सेवा देणे बंधनकारक. त्यांच्याजवळ आठ वर्षांपर्यंत सेवा वाढवण्याचा पर्याय. १८ वर्षांपासून लष्करात भर्ती सुरू होते. लष्करात सेवा देण्यास नकार दिल्यास मतदानाचा अधिकार काढून घेतला जातो. तसेच, निवडणुकीला उभेही राहता येत नाही. महिलांना यातून सवलत मिळते.

इराण– येथे १८ वर्षांच्या वरील प्रत्येक पुरुषाला १८ ते २४ महिन्यांपर्यंत लष्करात सेवा देणे बंधनकारक आहे. महिलांना हा नियम लागू नाही. जे पुरुष असे करण्यास नकार देतात, त्यांना सरकारी नोकरी मिळत नाही. तसेच, त्यांना परदेशी जाण्यावरही प्रतिबंध येतो.

तुर्की– २० ते ४१ वर्षांच्या सर्व पुरुषांना किमान सहा महिन्यांपर्यंत सेवा देणे बंधनकारक आहे. ते हा कालावधी आणखी सहा महिन्यांनी वाढवूही शकतात.

क्युबा– १६ वर्षांवरील पुरुष लष्करी सेवा देण्यास योग्य ठरतात. १७ ते २८ वर्षांवरील पुरुषांना दोन वर्षांपर्यंत लष्करात सेवा देणे बंधनकारक आहे. लष्करात सेवा देणाऱ्यांना ४५ वर्षांपर्यंत राखीव ठेवले जाते. म्हणजे त्यांना कधीही बोलावले जाऊ शकते. नकार दिल्यास तुरुंगवास किंवा दंड भरावा लागू शकतो.

स्वित्झर्लंड– २० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पुरुषांना लष्करात सेवा द्यावी लागते. महिलांसाठी हे स्वैच्छिक आहे. तरुणांना २१ वर्षांपर्यंत सेवा द्यावी लागते.

स्वीडन– येथे पुरुष आणि महिलांना नऊ ते १२ महिन्यांपर्यंत लष्करात सेवा द्यावी लागते. सन २०१०पर्यंत महिलांसाठी हे स्वैच्छिक होते. मात्र आता त्यांनाही अनिवार्य करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

‘केजरीवाल संधीसाधू, दिग्विजय अनुभवशून्य’

पराभवाचे खापर भाऊ-बहिणींवर नाही, तर तुमच्यावर फुटणार.. खर्गे साहेब तुमची नोकरी जाणार!

ठाकरेंच्या लंडन दौऱ्याचा एजेंडा काय?

‘आप’चा पाय आणखी खोलात; स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी बिभव कुमारचा जामीन नाकारला

भारतातील नियम काय सांगतो?

भारतात अनिवार्य लष्करी सेवेचा नियम नाही. सन २०१४मध्ये केंद्र सरकारने हे स्पष्ट केले होते की, भारत हा एक लोकशाही देश असून येथे प्रत्येकाला स्वतःचा पेशा निवडण्याचा अधिकार आहे.

Exit mobile version