पाकिस्तानातही राम प्राणप्रतिष्ठेचा जल्लोष

माजी क्रिकेटर दानिश कनेरियाने शेअर केला व्हिडीओ

पाकिस्तानातही राम प्राणप्रतिष्ठेचा जल्लोष

सोमवारी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा भव्य असा सोहळा संपन्न झाला. देशाच्या कानाकोपऱ्यात राम भक्तांमध्ये याचा जल्लोष दिसून आला. मात्र, हा उत्साह केवळ भारतातचं दिसला नसून तो भारताबाहेरील अनेक देशांमध्ये दिसून आला. जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या प्रत्येक राम भक्ताने हा सोहळा साजरा केला. पाकिस्तानच्या राम मंदिरातही हा खास सोहळा पार पडला, ज्यामध्ये माजी क्रिकेटर दानिश कनेरियानेही सहभाग घेतला होता. कनेरियाने या सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने सोमवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तो आपल्या कुटुंबासह आणि इतर काही राम भक्तांसह राम मंदिराचा सोहळा साजरा करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारे मंदिर हे कराचीमधील श्री स्वामी रामनारायण मंदिर आहे, ज्याला वडताल धाम असेही म्हणतात.

दानिश कनेरियाने गळ्यात उपरणं परिधान केल्याचे दिसते, ज्यावर कराची मंदिराचे नावही आहे. तसेच मंदिराच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी करून राम मंदिर सोहळा कसा साजरा करण्यात आला, हे व्हिडीओमध्ये दिसत आहे. कनेरिया पुजार्‍यांसोबत पूजा करताना दिसला. व्हिडिओच्या सुरुवातीला अयोध्येचे राम मंदिरही दिसत होते.

 हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींच्या रूपाने ‘श्रीमंत योगी’ प्राप्त झाले आहेत

राममंदिर १००० वर्षे अविचल, अटल!

राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारला

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला प्रभू रामांचा अभिषेक सोहळा!

दानिश कनेरिया सोशल मीडियावर राम मंदिराबाबत सतत भावना व्यक्त करत असतो. काही दिवसांपूर्वी दानिश कनेरियाने रामलल्लाचा फोटो शेअर केला होता. त्याने एक्सवर प्रभू रामांचा फोटो शेअर करताना लिहले होते, ‘माझे रामलल्ला विराजमान झाले. दुसर्‍या एका पोस्टमध्ये तो हातात भगवा ध्वज घेऊन उभा असल्याचा दिसत आहे. या फोटोखाली कॅप्शने देताना लिहले होते, ‘आमच्या राजा श्री राम यांचे भव्य मंदिर तयार आहे, आता प्रतीक्षा फक्त काही दिवसांची आहे! बोला जय जय श्री राम.’

Exit mobile version