एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील- नावडेकर यांच्या कुटुंबात ही दुर्दैवी घटना घडली आहे. काही दिवसांच्या अंतरावर पाटील- नावडेकर कुटुंबाने तीन माणसे गमावली त्यामुळे नावडे गावासह पनवेल तालुक्यात शोककळा पसरली आहे.
जुलै महिन्यामध्ये लक्ष्मण पाटील- नावडेकर यांच्या पत्नी जनाबाई यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी लक्ष्मण पाटील- नावडेकर यांचे निधन झाले. त्यानंतर लगेच सहा दिवसांनी म्हणजेच ११ ऑगस्टला त्यांचा मुलगा अविनाश यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अविनाश यांच्यावर पनवेलमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु बुधवारी सायंकाळी चार वाजता अविनाश यांचे निधन झाले.
हे ही वाचा:
अनधिकृत बांधकामांचा शेवटचा दिवस ३१ ऑगस्ट
चालुक्य कालीन मंदिरात झाली चोरी!
लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर आणि लक्ष्मण पाटील- नावडेकर यांची मैत्री जगजाहीर होती. लक्ष्मण पाटील- नावडेकर हे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी दीर्घ काळासाठी पनवेल तालुका कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते. ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाटील- नावडेकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता.
एकाच घरातील तिसऱ्या व्यक्तीचे निधन होणे ही घटना दुर्दैवी आहे. मी, माझे कुटुंब आणि पक्ष पाटील कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर यांनी दिली.