काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये निवडणुकीचे वारे वाहत होते. या निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पुन्हा एकदा बाजी मारत राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली. मॅक्रॉन हे गेल्या २० वर्षात सलग दुसऱ्यांदा विजय मिळवणारे पहिले फ्रेंच राष्ट्राध्यक्ष ठरलेत.
फ्रान्समधली निवडणूक कशी झाली?
फ्रान्समधील निवडणुकीच्या लढतीत १२ उमेदवारांनी राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर मतदानाच्या पहिल्या फेरीत इतर सर्व उमेदवारांमध्ये ‘एन मार्श’ या पक्षाचे संस्थापक इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ‘नॅशनल फ्रंट’ पक्षाच्या नेत्या मरीन ले पेन या दोघांनीच आघाडी घेतली होती. त्यामुळे मुख्य लढत ही मॅक्रॉन आणि पेन यांच्यात होती. या लढतीत इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मरीन ले पेन यांना मोठ्या अंतराने हरवले. निवडणुकीत इमॅन्युएल मॅक्रॉन यांना ५८ टक्के मतं मिळाली तर पेन यांना ४२ टक्के मतं मिळाली. मॅक्रॉन हे जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते तेव्हा सुद्धा त्यांनी पेन यांनाच पराभूत केलं होतं. मॅक्रॉन यांनी करोना कालावधीत केलेलं काम, युक्रेन युद्धासंदर्भातील भूमिका आणि जागतिक स्तरावरील संघटनेंसोबत ठेवलेले संबंध या सर्व गोष्टींच्या आधारावर त्यांची निवड नागरिकांनी केल्याची चर्चा आहे.
इमॅन्युएल मॅक्रॉन जिंकल्यावर भारताचा फायदा काय?
भारताचे फ्रान्सशी चांगले संबंध आहेत. आजवर फ्रान्सचे कोणतेही सरकार भारतविरोधी राहिलेले नाही. मॅक्रॉन यांनी त्यांच्या रॅलींमध्ये स्पष्ट केले आहे की, त्यांच्या अजेंडावर भारताला पहिले प्राधान्य आहे. UN म्हणजेच संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वाला फ्रान्सने नेहमीच पाठिंबा दिलेला आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात संरक्षण, सुरक्षा, अंतराळ आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याचा मोठा इतिहास आहे. भारत आणि फ्रान्स दहशतवाद आणि कट्टरतावादाचा सामना करण्यासाठी नेहमी एकत्र आहेत. दोन्ही देशांमधलं संरक्षण सहकार्य महत्त्वाचं आहे. भारताने फ्रान्सकडून राफेल विमानांची खरेदी करत आपली संरक्षण क्षमता वाढवलीये. भारताने ३६ लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी २०१५ मध्ये फ्रान्ससोबत करार केला होता. हा करार २०१६ मध्ये झाला पण या कराराची प्रक्रिया खूप आधी म्हणजे डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात सुरू झाली होती. हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या प्रभावाचा विचार केला तर भारत आणि फ्रान्स या दोन देशांमधलं सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात एकत्र असणं, त्यांच्यात करार होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
यापूर्वीही जेव्हा अमेरिका आणि ब्रिटन असे महत्त्वाचे काही देश भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पाडू पाहत होते तेव्हा फ्रान्स भारताच्या पाठीशी उभा होता. भारताला आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रात सहकार्य करत होता. भारताने जेव्हा पोखरणमध्ये दुसरी अणुचाचणी केली तेव्हा जगाने भारताला वाळीत टाकलं होतं, तेव्हाही फ्रान्स भारताच्या अणुस्फोटाचं समर्थन करत होता. एवढेच नाही तर त्याने भारताच्या अणुकार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहून मदत करण्याची तयारी दर्शवली होती. भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांमधले संबंध हे नेहमीच व्यावहारिक पातळीवर सुरळीत राहिले आहेत. या दोन्ही देशांचे संबंध हे दोन्ही देशांच्या हितसंबंधांना प्राधान्य देणारे आहेत.
हे ही वाचा:
‘महाराष्ट्र, केरळ, बंगालने पेट्रोलवरचा कर कमी केला नाही’
रथ ओढताना विजेचा धक्का लागून ११ भाविकांचा मृत्यू
एबीजी शिपयार्ड कंपनीच्या २६ कार्यालयांवर ईडीने टाकल्या धाडी
जसा फ्रान्स भारतासाठी उभा होता तसंच भारतही फ्रान्सच्या बाजूने उभा राहिला आहे. ‘शार्ली हेब्दो’ या मासिकाने २०१५ मध्ये मोहम्मद पैगंबरांवरचं कार्टून प्रसिद्ध केल्यानंतर या मासिकाच्या ऑफिसवर हल्ला झाला होता. हेच व्यंगचित्र वर्गामध्ये दाखवणाऱ्या सॅम्युअल पॅटी या शिक्षकाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. तेव्हा या शिक्षकाला श्रद्धांजली वाहताना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटलं होतं की, “आपण अशा प्रकारच्या कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही, शिक्षकाची हत्या म्हणजे इस्लामी अतिरेक्यांचा हल्ला आहे.” यानंतर फ्रेंच सरकारने इस्लामी कट्टरपंथियांच्या विरोधात मोहीम सुरू करत छापे टाकले होते. मॅक्रॉन यांच्या विधानानंतर मुस्लिमबहुल देशांमध्ये या विरोधातल्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याचे पडसाद भारतातसुद्धा उमटले होते. मात्र, त्यावेळी भारताने फ्रान्सला पाठींबा देत दहशतवादाविरोधात दोन्ही देश एकत्र लढा देतील असं म्हटलं होतं. त्यामुळे फ्रान्स आणि भारत या दोन देशांमधले चांगले असलेले संबंध आता मॅक्रॉन यांच्या कार्यकाळात आणखी कसे घट्ट होणार हे येत्या काळात कळेलच.