टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून त्यांच्या भारतदौऱ्यावर शिक्कामोर्तब केले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतात भेटण्यासाठी मी उत्सुक आहे,’ असे त्यांनी यात म्हटले आहे. अब्जाधीश मस्क हे या महिन्यात भारताला भेट देतील आणि नवीन कारखाना उघडण्याशी संबंधित गुंतवणूक योजनांची घोषणा करू शकतील, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर मस्क यांनी भारताच्या दौऱ्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वी, एलॉन मस्क यांनी भारतात टेस्ला इलेक्ट्रिक वाहने पुरवणे ही ‘नैसर्गिक प्रगती’ आहे, असे नमूद केले होते.
या भेटीदरम्यान टेस्लाचे सीईओ कंपनीचे इतर अधिकारी सोबत असण्याची शक्यता आहे, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ही बैठक होण्याची अपेक्षा आहे, परंतु एलॉन मस्क यांनी त्याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
गेल्या वर्षी जूनमध्ये एलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी, मस्क हे भारताला भेट देण्याच्या आपल्या योजनेबद्दल बोलले होते. तेव्हा टेस्ला लवकरच भारतीय बाजारपेठेत प्रवेश करेल, असे वृत्त आले होते.
सरकारने नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केल्यानंतर काही आठवड्यांनंतर एलॉन मस्क यांची भारतभेट होत आहे. या धोरणांनुसार, किमान ५० कोटी अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीसह देशात उत्पादन युनिट्स उभारणाऱ्या कंपन्यांना आयात शुल्कात सवलत दिली जाईल.
हे ही वाचा:
ओवेसिंच्या विरोधात कॉंग्रेस उमेदवार देणार नाही
परगाणा भागात इस्लामवाद्यांचा हिंदुंवर हल्ला
रश्मी बर्वेंना दणका; जात पडताळणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची १०वी यादी आली समोर!
कंपनीने भारत सरकारकडे गेल्या वर्षी आपली वाहने आयात करण्यासाठी शुल्क कपातीची मागणी केली होती. त्याआधी २०२२मध्ये एलॉन मस्क यांनी टेस्लाला भारतात आपल्या गाडीची विक्री आणि सर्व्हिस करण्याची परवानगी मिळाल्याशिवाय ते आपली उत्पादने येथे तयार करणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. तर, वर्षभरापूर्वी एलॉन मस्क यांनी देशात आयात केलेल्या वाहनांमध्ये टेस्ला यशस्वी झाल्यास भारतात उत्पादन युनिट स्थापन करता येईल. टेस्लाला त्यांची वाहने भारतात दाखल करायची होती, परंतु भारतातील आयात शुल्क जगातील कोणत्याही मोठ्या देशापेक्षा सर्वाधिक आहे,’ असे ते तेव्हा म्हणाले होते.