पाकिस्तानचे माजी पंतप्रधान निवडणूक लढण्यास अपात्र

पाकिस्तान निवडणूक आयोगाचा निकाल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान निवडणूक लढण्यास अपात्र

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तान निवडणूक आयोगाने मोठा झटका दिला आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाने इम्रान खानला पुढील ५ वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे. तोशाखाना प्रकरणात खोटे विधान केल्याबद्दल इम्रान खान यांना कलम ६३(१)(३) अंतर्गत अपात्र ठरवण्यात आले होते. पाकिस्तान निवडणूक आयोगाचे आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

इम्रान खान यांना मालमत्ता लपवल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने अपात्र ठरवले आहे. सत्ताधारी आघाडी सरकारच्या खासदारांनी ऑगस्टमध्ये इम्रान खानच्या विरोधात पाकिस्तानच्या निवडणूक आयोगासमोर खटला दाखल केला होता. तोशाखाना नावाच्या सरकारी स्टोअरमधून सवलतीच्या दरात खरेदी केलेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून त्यांना मिळालेले उत्पन्न उघड करण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांना अपात्र ठरवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती.

इम्रान खानने तोशाखान भेटीत मिळालेली तीन घड्याळे एका स्थानिक घड्याळ विक्रेत्याला १५.४ कोटींहून अधिक रुपयांना विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पाकिस्तानच्या कायद्यानुसार, परदेशी नेत्यांकडून मिळालेली कोणतीही भेट सरकारी तिजोरीत जमा करावी लागते, मात्र ती विकल्याचा आरोप इम्रान यांच्यावर आहे. आयोगाने सर्व संबंधित पक्षकारांना आणि त्यांच्या वकिलांना आज इस्लामाबाद येथील सचिवालयात निवडणूक अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते.

हे ही वाचा:

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात

सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’

अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?

माजी पंतप्रधानांनी पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य मोर्चा काढण्याची घोषणा केलेली असतानाच आयोगाने ही कारवाई केली आहे. आझादी मार्चसाठी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत इम्रान खान यांनी सांगितले होते की, ऑक्टोबरमध्येच हा मोर्चा सुरू केला जाईल. त्याची तयारी पूर्ण झाली असल्याचं म्हटलं होतं. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या पक्षाला ‘आझादी मार्च’साठी ७२ तासांचा अवधी दिला आहे. इम्रान खान यांनी ७२ तासांत कंटेनर तयार करण्यास सांगितले आहे. या कंटेनरमध्ये एअर कंडिशनर, पंखे, एअर कुलर, एलईडी, टॉयलेट, हिटर बसविण्याची मागणीही पक्षाने केली आहे.

Exit mobile version