पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची राजनैतिक कोंडी केली आहे. सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती दिल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानमधून प्रतिक्रिया येत असून पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) प्रमुख बिलावल भुट्टो- झरदारी यांनी यावर प्रतिक्रिया देताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना बिलावल भुट्टो- झरदारी म्हणाले की, “सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील. आमचे पाणी त्यातून वाहील किंवा त्यांचे रक्त वाहील.” यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत भुट्टो म्हणाले की, पाकिस्तान किंवा आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांच्या युद्ध भडकवण्याच्या किंवा सिंधू नदीचे पाणी वळवण्याच्या प्रयत्नांना सहन करणार नाही. ते (मोदी) म्हणतात की ते हजारो वर्षे जुन्या संस्कृतीचे वारस आहेत, परंतु ती संस्कृती मोहेंजोदारो, लरकाना येथे आहे. आम्ही तिचे खरे संरक्षक आहोत आणि आम्ही तिचे रक्षण करू, असे भुट्टो म्हणाले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला आहे. १९६० मध्ये सिंधू खोऱ्यातील सहा नद्यांचे पाणी भारत आणि पाकिस्तानमध्ये कसे वापरायचे आणि वितरित करायचे याचे नियमन करणारा करार झाला होता. भारताने या कराराला स्थगिती दिल्याने आता भविष्यात पाकिस्तानवर याचे मोठे परिणाम होणार आहेत. कारण पाकिस्तानमधील शेती व्यवसायाला या नद्या ८०% पाणी पुरवतात.
हेही वाचा..
पहलगाम हल्ल्याच्या विरोधात भोपाळ बंद
पहलगाम हल्ल्याला उत्तर देणे गरजेचे
‘उडान’ : १.४९ कोटींहून अधिक प्रवाशांना लाभ
बिहारमधील सभेत पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणात दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना शोधून कठोरात कठोर अशी कल्पनेपलीकडची शिक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. तर, संशयित दहशतवाद्यांच्या घरांना उध्वस्त करण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे.