जगभरात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येत असून सौदी अरेबियामध्ये यावर्षीच्या हज यात्रेवर याचा मोठा भीषण परिणाम दिसून आला. सौदी अरेबियामध्ये यावर्षीच्या हज यात्रेदरम्यान १३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अति उष्णतेमुळे आखाती देश असलेल्या सौदी अरेबियामध्ये बिकट अवस्था आहे. वाळवंटातील इस्लामिक पवित्र स्थळांवरील तापमान वाढले असल्याचे सौदीतील अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. यात अनेक अनधिकृत यात्रेकरू असल्याची बाब समोर आली होती. मृतांमध्ये सर्वाधिक आकडा हा इजिप्तच्या नागरिकांचा होता. त्यामुळे या पार्श्वभूमीवर इजिप्तने काही ट्रॅव्हल एजन्सीवर कारवाई केली आहे.
सौदीचे आरोग्य मंत्री फहद बिन अब्दुररहमान अल-जलाजेल यांनी सांगितले की, “१३०१ मृत्यूंपैकी ८३ टक्के हे अनधिकृत यात्रेकरू होते. जे पवित्र शहर मक्का आणि आसपास हज विधी पार पाडण्यासाठी वाढत्या तापमानात लांब अंतर चालत होते. सरकारी मालकीच्या अल एखबरिया टीव्हीशी बोलताना मंत्री म्हणाले की ९५ यात्रेकरूंवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत, त्यापैकी काहींना राजधानी रियाधमध्ये उपचारांसाठी विमानाने नेण्यात आले होते. अनेक मृत यात्रेकरूंकडे ओळखीची कागदपत्रे नसल्याने ओळख प्रक्रियेला उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले.”
मृतांमध्ये ६६० हून अधिक इजिप्शियन लोकांचा समावेश आहे. कैरोमधील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यापैकी ३१ वगळता सर्व अनधिकृत यात्रेकरू होते. या पार्श्वभूमीवर इजिप्तने १६ ट्रॅव्हल एजन्सींचे परवाने रद्द केले आहेत. या एजन्सींनी अनधिकृत यात्रेकरूंना सौदी अरेबियाला जाण्यास मदत केली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे इजिप्तने यावर्षी ५० हजारांहून अधिक अधिकृत यात्रेकरूंना सौदी अरेबियाला पाठवले. दरम्यान, सौदी अधिकाऱ्यांनी अनधिकृत यात्रेकरूंवर कारवाई केली आणि हजारो लोकांना बाहेर काढले. परंतु बहुतेक इजिप्शियन, मक्का आणि आसपासच्या पवित्र स्थळांवर पायी पोहोचण्यात यशस्वी झाले. अधिकृत यात्रेकरूंप्रमाणे, त्यांच्याकडे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी हॉटेल नव्हते.
वृत्तानुसार मृतांमध्ये इंडोनेशियातील १६५, भारतातील ९८ आणि जॉर्डन, ट्युनिशिया, मोरोक्को, अल्जेरिया आणि मलेशियामधील डझनभरहून अधिक यात्रेकरूंचा समावेश आहे. दोन अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. २ दशलक्षाहून अधिक लोक पाच दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी सौदी अरेबियाला जातात. या यात्रेदरम्यान अनेकदा चेंगराचेंगरीही झाली आहे. तर अनेकदा साथीचे आजारही पसरले आहेत. २०१५ मध्ये, मीना येथे झालेल्या चेंगराचेंगरीत २४०० हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. तर त्याच वर्षाच्या सुरुवातीला मक्काच्या ग्रँड मशिदीत एक क्रेन कोसळून १११ जणांचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा:
टीम इंडियाचा कोच होण्यापूर्वी पाच ‘गंभीर’ अटी
ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या राजेश अग्रवालांची प्रचारात आघाडी
अमोल काळेंच्या निधनानंतर मुंबई क्रिकेट संघटनेत पोटनिवडणूक!
भाजपा आमदार मंगेश चव्हाणना धमकी देणाऱ्या जोर्वेकरांविरोधात आंदोलन!
या वर्षी सुमारे १८ लाख यात्रेकरू हजसाठी दाखल झाले आहेत. यापैकी १६ लाख लोक इतर देशांतील आहेत. दरवर्षी हजारो यात्रेकरू हजला जातात, ज्यांच्याकडे व्हिसा असतो. तर, काही लोक पैशाअभावी चुकीच्या मार्गाने मक्का गाठतात.