इक्वेडॉरचे अध्यक्षपदाचे उमेदवार फर्नांडो विलाविसेन्शिओ यांची प्रचारयात्रा संपल्यानंतर बुधवारी रात्री हत्या करण्यात आली. ५९ वर्षीय फर्नांडो हे २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहिलेल्या आठ उमेदवारांपैकी एक होते.
फर्नांडो हे क्विटो येथे अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. प्रचार संपल्यानंतर ते त्यांच्या गाडीत बसत असतानाच एका व्यक्तीने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. इक्वेडॉरचे राष्ट्रपती गुइलेर्मो लासो यांनी सोशल मीडियावर त्यांच्या हत्येच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच, मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
फर्नांडो हे लोकप्रिय नेते होते. भ्रष्टाचाराविरोधात ते नेहमी आवाज उठवत. सन २००७ ते २०१७पर्यंत राफेल कोरिया यांच्या कार्यकाळात त्यांनी भ्रष्टाचारासंदर्भात अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यांनी सन २०१७ ते २०२३ दरम्यान नॅशनल असेंब्लीचे सदस्य म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या मागे पत्नी आणि पाच मुले आहेत.
हे ही वाचा:
विश्वचषक स्पर्धेच्या तयारीदरम्यान ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये आग
ज्ञानव्यापी मशीद परिसर सर्वेक्षणाच्या मीडिया कव्हरेजवर बंदी
केरळचे नाव बदलणार? विधानसभेने एकमताने मंजूर केला ठराव
पाकिस्तानची संसद बरखास्त; पंतप्रधान शहबाज शरीफ सरकारचा कार्यकाळही संपुष्टात
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकऱ्यांनी फर्नांडोच्या डोक्यात तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. घटनास्थळी ग्रेनेडही दिसले. मात्र त्याचा वापर केला नव्हता. संशयित मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातही त्यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले होते. मात्र तेव्हा ते या हल्ल्यातून सुखरूप बचावले होते.