अफगाणिस्तानमध्ये सत्ता पालट झाल्यावर तिथल्या नागरिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. अफगाणिस्तानमध्ये महागाईने उच्च टोक गाठले आहे. लोकांकडे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीही पैसे नाहीत. अफगाणिस्तानमधील बँक आणि पैसे विनिमय सेवा बंद असल्यामुळे काही लोकांकडे थोडेफार पैसे असले तरी ते सध्या त्यांना वापरता येत नाहीत. बँक सुरू करण्यात याव्या यासाठी काबूलमध्ये काही नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचे तीन ते चार महिन्यांपासून रखडलेले पगार देण्यात यावे, अशी मागणी केली.
‘द बँक ऑफ अफगाणिस्तान’ या बँकेने व्यावसायिक बँकांना शनिवारपासून बँक उघडण्याचे आणि बँकेतून नागरिकांना आठवड्याला २०० डॉलर किंवा २० हजार अफगाणी काढण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असे निर्देश दिले होते. हा तात्पुरता उपाय असून यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येईल, असे बँकेने स्पष्ट केले. देश आर्थिकदृष्ट्या इतर देशांवर अवलंबून असल्याचे लक्षात ठेऊन तालिबान्यांनी इतर देशांना मान्य असेल अशीच सत्ता प्रस्थापित करणार असल्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र अफगाणिस्तानमधील नागरिकांनाच याबाबत खात्री नाही.
हे ही वाचा:
ज्येष्ठ लेखक, नाट्य समीक्षक जयंत पवार यांचे निधन
आमदार केळकरांच्या प्रयत्नाने मिळाले ट्रॅफिक वॉर्डनचे थकीत पगार
२०५० मध्ये मुंबई बुडणार? मंत्रालय, नरिमन पॉइंट जाणार पाण्याखाली
धुरंधर ढेपाळले, भारताचा दारुण पराभव
अफगाणिस्तानमधील रुग्णालयात कर्मचारी संख्या कमी असल्याने महिला कर्मचारी वर्गाला पुन्हा कामावर रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र देशातील अनेक डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी देश सोडून इतर देशांत वास्तव्यास जाण्याच्या तयारीत आहेत. माजी सरकारी अधिकाऱ्यांनी सध्या वापरत असलेली सरकारची मालमत्ता रिकामी करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.
अफगाण नेते आणि तालिबान यांच्यामध्ये एक चांगले सरकार स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू आहे. सुरक्षा आणि राजकीय विकास तसेच भविष्यकालीन वाटचाल याबद्दल आणि सध्याची देशातील अस्थिरता अशा विषयांवर चर्चा केल्याचे सांगण्यात आले.