अश्विन शुद्ध दशमी अर्थातच दसरा हा शुभमुहूर्तांपैकी एक. प्रभू श्रीरामाने रावणाचा वध याच दिवशी केला तसेच दुर्गादेवीने महिषासुराचा वध करत असुरांवर याच दिवशी विजय मिळविला म्हणून या दिवसाला विजयादशमी असेही म्हटले जाते. याच दिवशी पांडवही अज्ञातवास संपवून आपल्या घरी परत निघाले, अशीही आख्यायिका आहे. दसऱ्याच्या दिवशीच रावणाच्या पुतळ्याचे दहन करून विजयादशमी साजरी केली जाते. या काळात विविध ठिकाणी रामलीलांचे आयोजनही केले जाते.
सरस्वतीची पूजा, शस्त्रांचे पूजन, सोने म्हणून आपट्याची पाने एकमेकांना देऊन सोने घ्या, सोन्यासारखे राहा, अशा शुभेच्छा देण्याचा हा सण.
शुभमुहूर्त म्हणून या दिवशी एखादी नवी वस्तू घरी आणण्याची परंपराही आहे. त्यामुळे या शुभमुहूर्ताला नवे घर, नवी गाडी घेण्याचा संकल्प अनेकजण पूर्ण करतात. या दिवशी एखाद्या कामाचा केलेला संकल्प नक्कीच पूर्ण होतो अशी मान्यता आहे. राजेमहाराजांच्या काळात दसरा महोत्सवाला विशेष महत्त्व होते. आता राजेमहाराजांचा काळ राहिला नसला तरी त्यांचे वारस अजूनही दसऱ्याचा तो सोहळा दिमाखात साजरा करतात.
नवरात्रीची सांगता या दिवशी दुर्गा देवीचे विसर्जन करून केली जाते. सीमोल्लंघनाचा दिवस म्हणूनही दसरा ओळखला जातो. या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द होणार?
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात झाले शस्त्रपूजन
मोदीजी, बांगलादेशी हिंदूंना मदत करा!
घराघरात सरस्वतीची प्रतिमा काढून तिचे पूजन केले जाते. विद्यार्थी आपल्याकडचे वही, पुस्तके या साहित्याची पूजा करतात तर व्यापारी आपल्या खातेवह्या, दागदागिने, इतर साधनसामुग्रीची पूजा करतात.
विजयादशमीच्या दिवशी शमीच्या वृक्षाची पूजा करण्याचीही परंपरा आहे. याच झाडावर पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे ठेवली होती.