इराणमध्ये हिजाब न घातल्यामुळे कुर्दिश तरुणी महसा अमिनी हिचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर निदर्शने कायम सुरु आहेत. देशभरातील आंदोलकांच्या तीव्र निषेधामुळे इराण सरकार दबावाखाली आले आहे. इराणमध्ये सुरु असलेल्या निदर्शनाचा एक भाग म्हणून इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने बुधवारी उत्तर इराकमधील कुर्दांना लक्ष्य करत आणखी एक ड्रोन हल्ला केला. या किमान नऊ जण ठार तर २८ जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे .
इराणच्या पॅरामिलिटरी रिव्होल्युशनरी गार्डने याआधी शनिवारी आणि सोमवारीही कुर्दीश भागात हल्ले केले होते. रिव्होल्युशनरी गार्डने सुलेमानियाजवळील १० कुर्दिश ठिकाणांवर हल्ला केला आहे. रिव्होल्यूशनरी गार्डने उत्तर इराकमधील फुटीरतावादी गटाला लक्ष्य करून क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोन हल्ले केले. बुधवारी इरबिलपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोया येथे हा हल्ला करण्यात आला होता असं एपी न्यूजनं म्हटलं आहे.
महसा अमिनी कुर्दिश महिला आहे. इराकमध्ये कुर्दिश नागरिक मोठ्या संख्येने राहतात. पोलीस कोठडीत तिचा मृत्यू झाल्यानंतर इराकमधील डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इराणी कुर्दिस्तान उक संघटनेनं आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे हे हल्ले होत आहेत. इराकी परराष्ट्र मंत्रालय आणि कुर्दिस्तान प्रादेशिक सरकारने या हल्ल्याचा निषेध केला आहे.संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी पोलिस कोठडीत तरुणीच्या मृत्यूनंतर सुरू झालेले देशव्यापी निदर्शने थांबवण्यासाठी निदर्शकांवर अनावश्यक बळाचा वापर करू नये असे आवाहन केले. त्याचबरोबर मुलीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करावी असे सांगितले आहे
इराणने तेहरानच्या मुख्य चौकांवर दंगलविरोधी पोलिस तैनात केले आहेत. आंदोलनादरम्यान पोलिसांसमोर निर्भयपणे उभी असलेली इराणी महिला हदीस नजाफीचा व्हिडिओ इंटरनेट मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसांनी या तरुणीवर गोळ्या झाडल्या होत्या.
हे ही वाचा:
नवरात्र २०२२ : परशुराम माता, रेणुकादेवीची कथा
कोकण विभागाकडून ११४ शेतकऱ्यांना पर्यटन प्रमाणपत्र
डीए वाढला; सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट
PFI बंदीवर काँग्रेसची प्रतिक्रिया; संघावर बंदी हवी!
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सांगितले की, इराण सरकारने आंदोलकांवर अनावश्यक कठोरता घेण्यापासून परावृत्त केले पाहिजे. गुटेरेस यांनी प्रवक्त्यामार्फत सांगितले की, इराणच्या प्रांतांमध्ये आणि तेहरानच्या राजधानीत अशांतता पसरवणाऱ्या २२ वर्षीय महसा अमिनीच्या मृत्यूची अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करावी.निदर्शनांशी संबंधित महिला आणि मुलांसह वाढत्या मृत्यूच्या वृत्तांबद्दल आम्ही चिंतेत आहोत, असं अँटोनियो गुटेरेस म्हणाले. ३१ राज्ये आणि ८० शहरांमध्ये पसरलेल्या निदर्शनांमध्ये आतापर्यंत ४१ लोकांचा मृत्यू झाला आहे.