डीआरडीओचे ‘ते’ औषध लोकसेवेत रूजू होणार

डीआरडीओचे ‘ते’ औषध लोकसेवेत रूजू होणार

कोरोनाविरुद्धच्या युद्धातील भारताचे दमदार पाऊल

सोमवारचा दिवस (१७ मे) तमाम भारतीयांसाठी आनंदाचा दिवस असेल. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) हैदराबादस्थित रेड्डीज लि.च्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या ड्रग २ डीऑक्सि डी ग्लुकोज या कोरोनावरील औषधाचे लोकार्पण केले जाणार आहे. कोरोनाविरुद्धच्या युद्धातील भारताचे आणखी एक आश्वासक पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत या प्रभावी औषधाचे उद्घाटन केले जाणार आहे.

हे ही वाचा:

स्वदेशी कोवॅक्सिन कोरोनाच्या सगळ्या प्रकारांवर प्रभावी

जपा स्वतःला…परिणाम होईल डोक्यावर

व्हेंटिलेटर्सचा वापर का केला नाही?

तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना भाजपा देणार मदतीचा हात

या औषधाची चाचणी घेण्यात आली त्यात टू डीजी हे औषध रुग्णालयात कोरोनामुळे दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या प्रकृतीत झटपट सुधारणा करू शकते. त्यामुळे ऑक्सिजनवर फार कमी अवलंबून राहण्यास हे औषध मदत करू शकते. सरकारच्या मते या औषधामुळे रुग्णाच्या आरटीपीसीआर चाचण्या निगेटिव्ह येण्याची शक्यता वाढते.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात डीआरडीओने या औषधाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू केली. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी हैदराबाद येथील सेल्युलर आणि मोलेक्युलर बायोलॉजीच्या माध्यमातून प्रयोगाला सुरुवात केली. त्यावेळी असे लक्षात आले की टू डीजी रेणू सार्स कोविड २ या विषाणूविरोधात प्रभावी कामगिरी करतात. विषाणूला वाढीला लगाम घालतात. ऑक्टोबर २०२०मध्ये या औषधाची दुसरी चाचणी केली गेली. तेव्हा कोरोना रुग्णांसाठी हे औषध उपयुक्त आहे, हे स्पष्ट होऊ लागले. जवळपास ११० रुग्णांवर त्याची चाचणी घेतली गेली. प्रथम सहा रुग्णालयांत आणि नंतर ११ रुग्णालयात हे औषध वापरले गेले. नंतर डिसेंबर २०२० आणि मार्च २०२१मध्ये या औषधाची तिसरी चाचणी घेतली गेली. त्यावेळी २२० रुग्णांवर ही चाचणी घेण्यात आली. दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांतील कोरोना रुग्णालयात या औषधाची चाचणी घेतली गेली. नियमित उपचारांमुळे कोरोनाचे रुग्ण ज्या कालावधीत बरे होतात, त्यापेक्षा या औषधामुळे अडीच दिवस आधी ते बरे होऊ शकतात, असे स्पष्ट झाले.

भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी या औषधाचे स्वागत केले असून सोमवारी याचे लोकार्पण होणार असल्याचे ट्विट केले आहे. आज सोनियाचा दिनू, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.

Exit mobile version