विश्व हिंदू परिषद अमेरिकेचे संस्थापक डॉ.महेश मेहता यांचे निधन

विश्व हिंदू परिषद अमेरिकेचे संस्थापक डॉ.महेश मेहता यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि विश्व हिंदू परिषद अमेरिकेचे संस्थापक डॉक्टर महेश मेहता यांचे निधन झाले आहे. मंगळवार, १४ डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८९ वर्षांचे होते.

डॉक्टर महेश मेहता हे शास्त्रज्ञ असून मेम्ब्रेन तंत्रज्ञान या विषयात ते संशोधन करत होते. डॉ.मेहता हे अतिशय उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी डबल डॉक्टरेट संपादन केली असून ते अमेरिकेत स्थायिक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य गोळवलकर गुरुजी यांचा डॉक्टर मेहतांवर प्रभाव होता.

गोळवलकर गुरुजींकडून प्रेरणा घेऊनच त्यांनी १९ ऑक्टोबर १९५७ रोजी विश्व हिंदू परिषद अमेरिकेची स्थापना केली. आज ५० वर्षांपेक्षा अधिक काळ ही संस्था कार्यरत आहे. १९८५ साली डॉक्टर मेहता यांच्या मार्गदर्शनात या संस्थेने न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध अशा मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत तब्बल ४५०० नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.

हे ही वाचा:

‘अमित शाह यांनी साखर कारखान्यांना इन्कम टॅक्सच्या जाचातून सोडवले’

‘अमरावतीची घटना पुन्हा घडली तर त्यांना सोडायचे नाही’

अनिल परब, हा तुझ्या बापाचा पैसा आहे का?

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे की अनिल परब?

२००० साली युनायटेड नेशन्स मिलेनियम पीस समिट या परिषदेचे आयोजन डॉ.मेहतांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतातील १०८ संत महंत आणि विद्वानांनी सहभाग नोंदवला होता. तर न्यूयॉर्क मध्ये हिंदू संगम या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या आयोजनातही डॉक्टर मेहता यांची भूमिका महत्त्वाची होती. या कार्यक्रमात भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हजेरी लावली होती.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात आणीबाणी जाहीर केल्यानंतर डॉक्टर मेहता यांनी त्याचा प्रखर विरोध केला होता. अमेरिकेत त्यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात अनेक आंदोलने केली होती. हिंदू धर्मासाठी आणि समाजासाठी झोकून देऊन काम करणार्‍या डॉक्टर मेहता यांच्या निधनाने समाजाची खूप मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होताना दिसत आहे.

Exit mobile version