अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. पुढील आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. ‘वार्षिक क्वाड समिट’मध्ये सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदी २१ सप्टेंबरपासून तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे डेलावेअर येथे चौथ्या ‘क्वॉड लीडर्स समिट’चे आयोजन करणार आहेत.
अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून निवडणूक प्रचाराच्या कामाला वेग आला आहे. अशाच एका निवडणूक प्रचार रॅलीला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, नरेंद्र मोदी यांची पुढच्या आठवड्यात भेट घेणार आहे. मोदी हे फँटास्टिक (विलक्षण) नेते आहेत. मात्र, त्यांनी त्यांच्या भेटीबाबत अधिक माहिती दिलेली नाही. अमेरिकेत ५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत ट्रम्प आणि पीएम मोदी यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे.
हे ही वाचा:
लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांकडील हजारो पेजर्सचा एकाच वेळी स्फोट
जम्मू- काश्मीर: १० वर्षांनी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
सनातन धर्म…पुस्तकाची कहाणी पॉडकास्टच्या रूपात लवकरच येणार समोर, टीझर जारी
भारताने पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, चीनला केले पराभूत !
परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, नरेंद्र मोदी २२ सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांनाही संबोधित करतील. तसेच २१ सप्टेंबर रोजी विल्मिंग्टन, डेलावेअर येथे ‘क्वाड लीडर्स समिट’मध्ये सहभागी होतील. या वर्षी भारताची क्वाड समिट आयोजित करण्याची पाळी होती. पण वॉशिंग्टनच्या विनंतीनंतर भारताने पुढील वर्षी शिखर परिषदेचे आयोजन करण्यास सहमती दर्शवली आहे. याशिवाय, न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान मोदी दोन्ही देशांमधील व्यापक सहकार्याला चालना देण्यासाठी आघाडीच्या अमेरिकन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) संवाद साधतील. याआधी नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात शेवटची भेट फेब्रुवारी २०२० मध्ये झाली होती.