अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी एफबीआयने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः याची माहिती दिली आहे. एफबीआयने ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील ‘मार-ए-लागो’ या निवासस्थानावर छापा टाकला आहे.
ट्रम्प यांनी त्यांचा सोशल मीडिया अॅप ट्रुथ सोशल नेटवर्कवर यासंबंधी माहिती दिली आहे. एफबीआय अधिकाऱ्यांनी पाम बीचवर असलेल्या ‘मार-ए-लागो’वर छापा टाकल्याची माहिती आहे. दरम्यान, २०२० साली ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर व्हाईट हाऊस सोडताना ट्म्प यांनी अनेक सरकारी कागदपत्र सोबत नेले होते. ही कागदपत्रं फ्लोरिडामधील त्यांच्या ‘मार-ए-लागो’ येथून हस्तगत करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा येथे छापेमारी करण्यात येत आहे. एफबीआयने छापा टाकला तेव्हा ट्रम्प फ्लोरिडामध्ये उपस्थित नव्हते.
‘अमेरिकेसाठी हा काळा दिवस असून लोकशाहीवरचा हल्ला आहे. सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांचा गैरवापर होत असून मी २०२४ मध्ये निवडणुकीसाठी उभं राहू नये म्हणून ही विरोधकांची खेळी आहे,’ असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
‘जमाते इस्लामी’ संघटनेसंबंधित जम्मू काशमीरमध्ये NIA कडून छापेमारी
नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ठरला
टीईटी घोटाळा प्रकरणात मनी लॉंड्रिंग
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात न्याय विभाग दोन प्रकरणांची चौकशी करत असून पहिले प्रकरण हे २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल बदलण्याच्या प्रयत्नाशी संबंधित आहे. तर दुसरे प्रकरण हे कागदपत्रे हाताळण्यासंदर्भात आहे. याबाबत व्हाईट हाऊस, न्याय विभाग यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.