अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्या एक्स (ट्विटर) खात्यावरून आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यांचे एक्स खाते हॅक करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांच्या हॅक करण्यात आलेल्या खात्यावरून सातत्याने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या जात आहेत. मात्र, हे खाते हॅक झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निधन झाल्याचे त्यांच्या एक्स खात्यावरून पोस्ट करण्यात आले. हे वृत्त खोटे असल्याचे समोर आले आहे. हॅकरने डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या एक्स खात्यावरून पोस्ट केले आहे की, “माझे वडील डोनाल्ड ट्रम्प यांचे निधन झाले आहे. ते या जगात नाहीत हे सांगताना मला खूप वाईट वाटत आहे. मी २०२४ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेत आहे.”
त्यानंतर उत्तर कोरियाला उध्दवस्त केले जाईल, अशीही पोस्ट डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्या एक्स खात्यावरून पोस्ट करण्यात आली आहे. तसेच हॅकर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावरही आक्षेपार्ह भाषेत टीका करत असून एक्सचे मालक इलॉन मस्क यांच्याबाबतही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या जात आहेत. हॅकरने लोगन पॉलबाबतही आक्षेपार्ह पोस्ट केल्या आहेत. या सर्व पोस्ट पाहता हे अकाउंट हॅक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा:
काही देशांच्या संसदेत ५० टक्क्यांहून अधिक महिला
सुप्रिया सुळेंना नको आहे महिला आरक्षणाचा लाभ
शर्टाचे बटण उघडे ठेवल्यामुळे गुन्हा !
कॅनडाला भारताशी पंगा भारी पडणार; आर्थिक फटका बसण्याची शक्यता
कालांतराने या पोस्ट तातडीने डिलीट करण्यात आल्या असल्या तरी या अशा पोस्टमुळे खळबळ उडाली होती. शिवाय यामुळे डिजिटल मंच्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर, डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प हे राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून अनेकदा ते त्यांची मते ‘एक्स’च्या माध्यमातून व्यक्त करत असतात.