बलात्कार केल्याचा दावा फेटाळून लेखिका ई. जीन कॅरोल यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवल्याबद्दल आठ कोटी ३३ लाख डॉलर देण्याचे आदेश मॅनहॅटनच्या न्यायाधीशांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिले आहेत. ट्रम्प या निकालावर अपील करण्याच्या विचारात आहेत.
पाच दिवस या खटल्याची सुनावणी चालली. मॅनहॅटन फेडरल कोर्टाला हा निर्णय सुनावताना तीन तासही लागले नाहीत. कॅरॉल यांनी एक कोटी अमेरिकी डॉलरची मागणी केली होती. मात्र न्यायाधीशांनी त्याच्या कितीतरी पट अधिक रक्कम देण्याचे निर्देश दिले.
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेमधील निवडणुकीत पुन्हा व्हाइट हाऊसमध्ये जाण्याचा मनसुबा असून त्या दिशेने त्यांच्या प्रचारानेही वेग घेतला आहे. रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ते आघाडीवर आहेत. त्यांना रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास ते अमेरिकी अध्यक्षपदासाठी डेमोक्रेटिक पक्षाचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी लढतील. जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा सन २०२०मध्ये पराभव केला होता.
ट्रम्प या खटल्यातील सुनावणीसाठी बहुतांशवेळी हजर होते. मात्र निर्णय सुनावताना ते अनुपस्थित राहिले. मात्र त्यानंतर त्यांनी या निकालाबाबत तिखट प्रतिक्रिया दिली. ‘आपली कायदा यंत्रणा नियंत्रणाबाहेर आहे आणि तिचा वापर राजकीय शस्त्र म्हणून केला जात आहे. ही अमेरिका नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियावर दिली. तर, ‘नेस्तनाबूत करून पुन्हा उभ्या राहिलेल्या प्रत्येक महिलेचा हा विजय आहे, तिला ठेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक गुंडाचा मोठा पराभव आहे,’ अशी प्रतिक्रिया कॅरॉल यांनी विजयानंतर दिली.
हे ही वाचा:
बंगालमधील राहुल गांधी यांच्या यात्रेला परवानगी नाही
सरकारकडून जीआर मिळताच जरांगेंकडून आंदोलन मागे
जरांगे म्हणतात आमचा विरोध संपला; आरक्षणाबाबत सरकारकडे अध्यादेश तयार
मोइज्जू यांना झाली जुन्या मैत्रीची आठवण, प्रजासत्ताक दिनाच्या भारताला दिल्या शुभेच्छा!
मॅनहॅटनमधील बर्गडॉर्फ गुडमन डिपार्टमेंट स्टोअर ड्रेसिंग रूममध्ये १९९०च्या सुमारास ट्रम्पने आपल्यावर बलात्कार केल्याचा दावा स्तंभलेखिकेने नोव्हेंबर२०१९मध्ये केला होता. मात्र ट्रम्प यांनी तो फेटाळून लावल्याने तिने पाच महिन्यांपूर्वी ट्रम्पविरोधात खटला दाखल केला होता. ट्रम्प यांनी नकार दिल्यामुळे एक पत्रकार म्हणून तिच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचल्याचे तिने सांगितले.