एनडीए परिक्षेत देवेन शिंदेला देशात तिसरा क्रमांक

एनडीए परिक्षेत देवेन शिंदेला देशात तिसरा क्रमांक

मुंबई पोलिस सेवेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक असलेल्या वडिलांच्या मुलाने स्वप्न पाहिले लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याचे. ते स्वप्न त्याने केवळ पूर्णच केले नाही, तर राष्ट्रीय संरक्षण अकादमीसाठी (एनडीए) झालेल्या परीक्षेत देशभरातील ४७८ यशस्वी उमेदवारांमध्ये त्याने तिसरा क्रमांक पटकावून महाराष्ट्राची शान उंचावली.

नामदेव शिंदे यांचा सुपुत्र देवेन शिंदे याने ही कामगिरी करून आपल्या आईवडिलांना कृतकृत्य केले आहे. आदित्य राणा, नकुल सक्सेना यांच्यानंतर या ४७८ जणांच्या यादीत देवेनचा क्रमांक येतो.

देवेन शिंदेने गेल्या वर्षी ही परीक्षा दिली. भारतात त्याने तिसरा क्रमांक पटकाविला आहेच, पण ही कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्रातून तो पहिला आला आहे.

हे ही वाचा:
लसीकरणाच्या गोंधळात अजून वाढ

शेतकरी आंदोलकांचा पुन्हा राडा

मांजरीची हत्या करणाऱ्या अनोळखी ग्राहकावर गुन्हा

अंबरनाथमधील थरारपट… नदी बने नाला!

देवेनचे वडील नामदेव शिंदे हे कस्तुरबा मार्ग, बोरिवली (पूर्व) पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक आहेत. गेली ३१ वर्षे ते पोलिस दलात आहेत.

आपल्या मुलाच्या या यशाबद्दल ते म्हणाले की, देवेनला संरक्षण क्षेत्राची आवड होती. त्याने ती इच्छा बोलून दाखविली होती. मग आम्ही १५ दिवसांचा क्रॅश कोर्स करण्यासाठी त्याला ठाण्याच्या कर्नल दळवी यांच्याकडे घेऊन गेलो. शिवाय, पुण्याचे ब्रिगेडियर गिल, अक्षय सर, निगडीचे सावरकर प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनामुळे त्याला हे यश मिळविणे शक्य झाले.

शिंदे म्हणाले की, खरेतर, त्याची परीक्षा एप्रिलमध्ये होणार होती, पण कोरोनामुळे पुढे ढकलली गेली आणि अखेर ती सप्टेंबरमध्ये झाली. नंतर त्याची मुलाखत अलाहाबाद केंद्रात झाली. या सगळ्या प्रक्रियेतून तावून सुलाखून निघाल्यानंतर अखेर त्याची निवड खडकवासला येथे एनडीएच्या अकादमीतील प्रशिक्षणासाठी झाली आहे. लवकरच तिथे रुजू होण्याचे पत्र त्याला मिळेल. देवेनने सेनादलाला प्राधान्य दिले आहे. नेव्हल अकादमीची परीक्षा उत्तीर्ण करून सध्या तो केरळला तो कोर्स करत आहे.

Exit mobile version