बांगलादेशमध्ये सातत्याने अल्पसंख्यांक विशेषतः हिंदूंना आणि हिंदू मंदिरांना लक्ष्य केले जात असल्याच्या घटना घडत आहेत. हिंदू मंदिरांना लक्ष्य करून तोडफोड केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दोन दिवसांत, बांगलादेशातील मैमनसिंग आणि दिनाजपूर जिल्ह्यांतील तीन हिंदू मंदिरांतील मूर्तींची तोडफोड केल्याची बाब उघडकीस आली आहे. आरोपींनी आठ मूर्तींची तोडफोड केल्याचे वृत्त आहे.
मैमनसिंगमधील घटनांसंदर्भात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून मैमनसिंगच्या हालूघाट उपजिल्ह्यात गुरुवारी आणि शुक्रवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मंदिरातील मूर्तींची तोडफोड करण्यात आली. गुरुवारी पहाटे बीलदोरा युनियनमधील पोलाशकांदा काली मंदिरातील मूर्तीची तोडफोड करण्यात आली. यानंतर पोलिसांनी पोलाशकांडा गावातील २७ वर्षीय अलाल उद्दीन याला अटक केली. चौकशीदरम्यान संशयिताने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली असून शुक्रवारी मैमनसिंग न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दुसरीकडे, दिनाजपूरच्या बीरगंज उपजिल्ह्यात मंगळवारी झारबारी शाशन काली मंदिरात पाच मूर्तींची तोडफोड करण्यात आली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली.
हे ही वाचा :
कल्याणमधील मराठी माणसावर हल्ला प्रकरणी आणखी दोघांच्या आवळल्या मुसक्या
मॅग्डेबर्गमधील ख्रिसमस मार्केटमध्ये गाडी घुसून दोन ठार; सौदीच्या ५० वर्षीय डॉक्टरला अटक
हिवाळी अधिवेशनात व्यत्ययामुळे लोकसभेचे ७० तास वाया!
कल्याण मारहाण प्रकरण; अखिलेश शुक्लाने मांडली व्हिडिओतून बाजू!
ऑगस्टमध्ये बांगलादेशमध्ये सत्तापालट झाल्यापासून हिंदू मंदिरे आणि मालमत्तांवरील हल्ल्यांत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात, अधिकाऱ्यांनी सुनमगंज जिल्ह्यात हिंदू मंदिराची तोडफोड आणि हिंदू घरे आणि दुकानांवर हल्ला केल्याबद्दल चार जणांना अटक केली होती. बांगलादेशने हसीना यांना सत्तेवरून हटवल्यापासून अल्पसंख्यांकांवर, प्रामुख्याने हिंदूंविरुद्ध जातीय हिंसाचाराच्या ८८ घटनांची कबुली दिली आहे. या घटनांमुळे भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध आणखी ताणले गेले आहेत.