बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारच्या हातात सूत्रे आली आहेत. मात्र, हिंदुंवरील हल्ले कमी होण्याची चिन्हे अद्याप दिसत नसून वारंवार हिंदूंना आणि मंदिरांना लक्ष्य करण्यात येत आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर आणि हिंदूंच्या मंदिरांवर अजूनही हल्ले होत आहेत. दरम्यान, दुर्गापूजेसाठी बनवण्यात आलेल्या मूर्तीची विटंबना केल्याचे दिसते आहे.
बांगलादेशमधील शेरपूर जिल्ह्यात दुर्गापूजासाठी म्हणून मूर्ती बनवण्यात आली होती. यानंतर रात्री उशिरा काही उपद्रवी लोकांनी मंदिराचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला. दुर्गा पूजेसाठी मातीपासून बनवण्यात आलेल्या मातेच्या मूर्तीची या अज्ञात लोकांनी विटंबना केली. शेरपूर जिल्ह्यातील हा भाग मेघालय सीमेला लागून आहे. मंदिर समितीचे सरचिटणीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पेट्रोल शिंपडून मूर्ती जाळण्याचाही प्रयत्न केला मात्र, आग लागू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान उपद्रवी घटनास्थळावरून पळून गेले होते.
हे ही वाचा:
निषाद कुमारची २.०४ मीटर ‘उंच उडी’ मारत रौप्य पदकाला गवसणी
पॅरालिम्पिकमध्ये प्रीती पालने पटकावले आणखी एक कांस्य पदक
ममता दीदी भेट देईनात, टीएमसी प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा
आप आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरावर ईडीचा छापा
या घटनेत पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. तपासानंतर हल्लेखोरांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन स्थानिक पोलिसांनी दिले आहे. बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. तत्कालीन पंतप्रधान हसीना शेख यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत भारतात आश्रय घेतला. या दरम्यान, बांगलादेशमध्ये वारंवार हिंदूंच्या घरांना आणि मंदिरांना लक्ष्य केले जात आहे. ५२ जिल्ह्यांमध्ये हिंदूंवरील हल्ल्याच्या घटनांचा आकडा २०५ वर पोहोचला. बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतरही सातत्याने हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. हिंदूंच्या मंदिरांवरही हल्ले होत आहेत.