अमेरिकेतील गोळीबारात चार शिखांचा मृत्यू

अमेरिकेतील गोळीबारात चार शिखांचा मृत्यू

अमेरिकेच्या इंडिअनॅपलिस शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फेडेक्स कंपनीच्या केंद्राजवळ एका इसमाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात आठ कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला. त्यापैकी चार लोक हे शीख समुदायाचे होते.

ज्या इसमाकडून गोळीबार करण्यात आला त्याचे वय केवळ १९ वर्षांचे होते असे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आले. हा इसम पूर्वी फेडेक्सचा कर्मचारी असल्याचे देखील कळले आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री ११ वाजता हा हल्ला करण्यात आला होता. पोलिसांच्या सांगण्यानुसार याबाबत कोणत्याही वांशिक द्वेषाचा मुद्दा असल्याचे इतक्यात सांगता येऊ शकत नाही. परंतु शीख समुदायाकडून या दृष्टीने तपास केला जाण्याची मागणी करण्यात आली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेकडून ही माहिती प्राप्त झाली आहे.

हे ही वाचा:

चिनी दबावाविरुद्ध अमेरिका-जपानची वज्रमूठ

आम्ही न्यायासाठी लढत राहू

भगव्या कफनीने केला त्यांचा घात

न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील

एएनआयने केलेल्या ट्वीट नुसार, इंडिअनॅपलिसचे मुख्य पोलिस रंडाल टेलर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्याठिकाणी हा गोळीबार झाला तिथे काम करणारे बहुसंख्य कामगार शीख समुदायाचे होते. त्या इसमाने या सर्वांवर अंदाधुंद गोळीबार का केला, याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

आम्ही इंडिअनॅपलिस इथल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांबद्दल अतीव शोक व्यक्त करतो. आशियाई- अमेरिकनांबद्दल वाढता हिंसाचार आणि द्वेष ही धक्कादायक बाब आहे. आम्ही बायडेन प्रशासनाला या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मदत करावी अशी विनंती करतो

-शीख काऊन्सिल ऑन रिलिजन अँड एज्युकेशनचे अध्यक्ष डॉ. राजवंत सिंह

याबाबत भारतीय दूतावासाने प्रसिद्धी पत्रक काढले आहे. भारतीय दूतावासाने या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्य श्रद्धांजली वाहिली आहे तर, जखमी नागरीकांसाठी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना देखील केली आहे. त्याबरोबरच दूतावासाच्या शिकागो येथील कार्यालय स्थानिक प्रशासनाचा संपर्कात असल्याचे देखील सांगण्यात आले. त्याचप्रमाणे भारतीय दूतावासाकडून गरज पडल्यास आवश्यक ती सर्व मदत करण्याचे देखील कबूल करण्यात आले. इंडिअनॅपलिसच्या महापौरांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याबरोबरच दूतावासाने आमचे या घटनेकडे बारीक लक्ष असून आवश्यक ती सर्व मदत देण्याचे त्यांनी सांगितले आहे.

Exit mobile version