दोन दिवसांपूर्वी पुणे स्थित सिरम इन्स्टिट्युटला आग लागली होती. या आगीत सिरम इन्स्टिट्युट बनवत असलेल्या कोविड-१९ च्या कोविशील्ड या लशीच्या निर्मीतीचे नुकसान झाले नसले, तरीही सिरम इन्स्टिट्युट बनवत असलेल्या बीसीजी आणि रोटा व्हायरसच्या लशीच्या उत्पादनाचे मात्र नुकसान झाले आहे.
शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सिरम इन्स्टिट्युटचे सी.ई.ओ अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, आगीच्या घटनेमुळे कोविशील्डच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसला तरी या आगीमुळे बीसीजी आणि रोटा व्हायरसच्या उत्पादन आणि साठवणुक यंत्रणांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबरोबरच इन्स्टिट्युटला मोठा आर्थिक फटका देखील बसला आहे. जवळपास एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आपल्या सुदैवाने आग दुसऱ्या इमारतीत लागली आणि कोविशील्डच्या उत्पादनाचे आणि पुरवठ्याचे काही नुकसान झाले नाही.
या इमारतीच्या वायरींगचे काम चालू असताना तिथे आग लागली. यावेळी या यंत्रणेवर काम करणाऱ्या पाच कामगारांचा मृत्यु झाला. याबाबत बोलताना आदर पुनावाला म्हणाले की, सुरूवातीला आम्हाला सांगण्यात आले की कोणाचाही मृत्यु झालेला नाही. नंतर जसजसा धूर बाजूला झाला आम्हाला मृत्युमुखी पडलेल्या पाच दुर्दैवी कामगारांचे मृतदेह दिसले. म्हणून मग मी नंतर त्या कामगारांच्या कुटुंबियांकरिता शोकसंदेश पाठवला.
आदर पुनावाला यांचे वडील सायरस पुनावाला (सिरम इन्स्टिट्युटची ज्या समूहाचा भाग आहे, त्या पुनावाला समूहाचे अध्यक्ष) यांनी मृत्युमुखी पडलेल्या सर्व कामगारांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत जाहिर केली आहे.
या पत्रकार परिषदेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. कोविड-१९ ने जगभरात थैमान घातले असताना. सिरम इन्स्टिट्युटच्या रुपाने आपल्यासमोर आशेचा किरण दिसला होता. ज्यावेळी आगीची बातमी पसरली तेव्हा सर्वजण कोविड लशीच्या काळजीने धास्तावले होते, परंतु सुदैवाने कोविशील्डचे उत्पादन आणि साठा दोन्ही सुरक्षित आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की कोविड लशीच्या उत्पादनावर कोणताही परिणाम झालेला नाही, असे पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.