भारताचा कुस्तीगीर रविकुमार दहिया ५७ किलो वजनी गटात अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक निश्चित झाले आहे. त्याने जिंकलेल्या या लढतीसोबतच कझाकस्तानचा प्रतिस्पर्धी नूरइस्लाम सानायेव्ह याच्या अखिलाडुवृत्तीचीही जोरदार चर्चा झाली.
सानायेव्हने या लढतीदरम्यान रविकुमारच्या उजव्या दंडाचा जोरदार चावा घेतला. पण रविकुमारने आपली पकड अजिबात ढिली न करता सानायेव्हवर मात केली आणि अंतिम फेरीत धडक मारली. सानायेव्हने घेतलेल्या चाव्याची छायाचित्रे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली होती.
रविकुमारने ही लढत ७-९ अशी जिंकली. त्यात रविकुमार सुरुवातीला २-९ असा मागे पडला होता पण त्याने जोरदार मुसंडी मारत पुनरागमन केले. शेवटच्या मिनिटात त्याने सानायेव्हच्या पायांची पकड घेतली आणि त्याला खाली पाडले. त्या आधारावर पंचांनी रविकुमारला विजयी ठरविले. त्याच शेवटच्या क्षणांत रविकुमारच्या उजव्या दंडाचा चावा सानायेव्ह घेऊ लागला. पण हरयाणाच्या रविकुमारने सानायेव्हचे हे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत.
हे ही वाचा:
उपाहारगृहे, हॉटेलात ४ नंतर कोरोनाची भीती?
मराठा आरक्षणाच्या बाबतीत ठोस निर्णय घेण्याची धमक ठाकरे सरकारमध्ये नाही
‘या’मुळे जम्मू ते श्रीनगर प्रवास होणार सुलभ
रविकुमारचे प्रशिक्षक यासंदर्भात म्हणाले की, जेव्हा रविकुमार विजयी होऊन रिंगच्या बाहेर आला तेव्हा त्याच्या दंडावर चावल्याच्या खुणा दिसत होत्या. आम्ही त्यावर बर्फ लावून वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला. अंतिम फेरीसाठी मात्र तो पूर्णपणे सज्ज आहे. कोणतीही समस्या नाही.
अशीच स्थिती भारताचा कुस्तीगीर सुशीलकुमारच्या बाबतीतही घडली होती. लंडन ऑलिम्पिकमध्ये तो ०-३ असा पिछाडीवर असताना त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूच्या कानाचा चावा घेतल्याचा आरोप झाला होता. शेवटी सुशीलकुमारला अंतिम फेरीमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.