ओली रॉबिन्सनवर इंग्लंड बोर्डाने केली कारवाई
ओली रॉबिन्सनने २०१२-१३मध्ये केलेल्या ट्विटची शिक्षा त्याला तब्बल ८-९ वर्षांनी भोगावी लागली. ओली रॉबिन्सन हा इंग्लंडचा कसोटीपटू आणि गोलंदाज. २७ वर्षांच्या या खेळाडूने सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत १०१ धावांत ७ बळी घेतले तसेच ४२ धावाही केल्या. या कामगिरीबद्दल कौतुक होत असताना त्याच्यावर ही शिक्षेची कुऱ्हाड कोसळली. त्याला त्या जुन्या ट्विटमुळे संघातून बाहेर काढण्यात आले. ही ट्विट वर्णद्वेषी, लिंगभेद करणारी किंवा विविध स्तरावर हेटाळणी करणारी असल्याचे सिद्ध झाले.
ससेक्सकडून खेळणारा रॉबिन्सन १८ वर्षांचा असताना त्याने ही ट्विट केली होती. आता ती ट्विट पुन्हा एकदा चर्चेत आली आणि रॉबिन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे आता १० जूनपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत तो इंग्लंडकडून खेळणार नाही.
हे ही वाचा:
अल्फा, डेल्टानंतर हा नवा व्हेरियंट, ७ दिवसांत वजन कमी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
अजितदादा, पहाटेच्या शपथविधीनंतर घरी घेतलं नसतं तर काय लायकी राहिली असती?
चीनचा प्रश्न सोडवायला नरेंद्र मोदी सक्षम
इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी या ट्विटवर टीका केली आणि त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले. शिवाय, रॉबिन्सनला संघातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केल्याचेही जाहीर केले. बोर्डाने म्हटले आहे की, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला इंग्लंड संघात स्थान देण्यात येणार नाही.
हे आदेश देण्यात आल्यानंतर रॉबिन्सनने तात्काळ इंग्लंड संघ सोडला आणि तो आपल्या घरी निघून आला.
खरे तर पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशीच त्याने आपल्या ट्विटबद्दल क्षमा मागितली होती. सोशल मीडियावर ही ट्विट जगजाहीर झाल्यानंतर आपल्याला स्वतःची लाज वाटते. पण मी वर्णद्वेषी किंवा लिंगभेद करणारा नाही, असेही तो म्हणाला. आता मी एक परिपक्व व्यक्ती आहे आणि या ट्विटबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मात्र इंग्लंड बोर्डाने त्याच्यावर तरीही कारवाई केली.