केंद्र सरकारच्या सूचनेचा परिणाम
हैदराबादस्थित भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लसीचे दर हे आता प्रत्येक डोसमागे ६०० रुपयांवरून ४०० रुपये केले आहेत. खासगी रुग्णालयांसाठी मात्र हे दर १२०० रुपये प्रति डोस असेच राहणार आहेत. केंद्र सरकारने सोमवारी सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या अनुक्रमे कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशी बनविणाऱ्या कंपन्यांना लशींचे दर कमी करण्यास सांगितले होते. त्यानुसार यापैकी भारत बायोटेकने राज्यांना देण्यात येणाऱ्या लशींचे दर ६०० वरून ४०० रुपये केले आहेत. म्हणजेच २०० रुपयांची घट केली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात केलेल्या सूचनेचा मान राखून कोव्हॅक्सिनचे दर खाली आणले आहेत. कोव्हिशिल्डने मात्र राज्यांसाठी लशींची किंमत आधीपासूनच ४०० रुपयेच ठेवली आहे.
लशींच्या किमतीबाबत कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्याशी झालेल्या बैठकीत लशींच्या किमतीबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार या कंपन्या लशींच्या किमतीबाबत पुनर्विचार करतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार भारत बायोटेकने लशींची किंमत २०० रुपयांनी कमी केली आहे.
“भारताला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे”, प्रिन्स चार्ल्स
कोविडकाळात नागरिकांना सैन्याची साथ
लसीकरण केंद्रावरील गर्दी कधी ‘ब्रेक’ होणार?
कोरोना रुग्णांसाठी अजय देवगणकडून १ कोटींची मदत
भारत बायोटेकने २५ एप्रिलला राज्य सरकारांसाठी ६०० रुपये दर ठेवला होता तर खासगी रुग्णालयांसाठी हीच लस १२०० रुपये ठेवली होती. तर कोव्हिशिल्डचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटने राज्य सरकारांसाठी ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये किंमत निश्चित केली होती.
केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार प्रत्येक राज्यात १८ ते ४४ वर्षांदरम्यानच्या नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. याआधी ४५ वयापेक्षा अधिक वय असलेल्यांना लसीकरण करण्यात येत होते.
लसींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आपल्याकडील ५० टक्के उत्पादन केंद्राला वितरित करणार आहेत तर ५० टक्के हे खुल्या बाजारात विक्री करतील. केंद्रासाठी हीच लस १५० रुपये प्रति डोस इतकी असेल. त्यामुळे लशींच्या किमती १५० रुपयांवर आणा, अशी मागणीही काही राज्यांनी केली होती.