भारतीय महिला हॉकी संघाच्या यशात या दांपत्याचाही वाटा

भारतीय महिला हॉकी संघाच्या यशात या दांपत्याचाही वाटा

महिलांच्या भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारतीय महिला प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडकल्या आहेत. याचे श्रेय मुलींच्या मेहनतीला, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला आहेच, पण मुलींच्या या कामगिरीचा भक्कम पाया ४४ वर्षांपूर्वी एका दांपत्याने रचला होता.

सतिंदरसिंग वालिया आणि त्यांची पत्नी लीला वालिया यांनी १९७७मध्ये रेल्वेसाठी मुलींचे संघ तयार केले आणि तिथून भारतीय मुलींच्या हॉकीच्या यशस्वी प्रवासाला प्रारंभ झाला. तेव्हापासून आजतागायत भारतीय संघात रेल्वेच्या मुलींची सर्वाधिक संख्या आहे. यावेळेलाही नवनीत कौर, दीपग्रेस एक्का, वंदना कटियार, रजनी, मोनिका आणि सुशीला चानू या रेल्वेच्या खेळाडू भारतीय संघात आहेत. त्यातील चार मुली या पश्चिम रेल्वेच्या आहेत. या सर्व मुली तिकीट तपासनीचे काम करतात. रेल्वेच्या मुलींचे प्रतिनिधित्व आजही तेवढेच आहे याचे श्रेय या दांपत्याला द्यावे लागेल.

सतिंदर वालिया आणि लीला नायडू-वालिया हे दोघेही अत्यंत गुणवत्तावान. सतिंदर हे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय हॉकीपटू, पंच, प्रशिक्षक अशा विविध भूमिकांमध्ये वावरलेले. ते फुटबॉलपटूही होते तर लीला वालिया या आधी कबड्डी, व्हॉलीबॉल खेळत आणि नंतर त्या हॉकीकडे वळल्या. सतिंदर हे आशियाई क्रीडा स्पर्धांत भारतीय संघाचे प्रशिक्षकही होते. १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये त्यांना प्रशिक्षक म्हणून जाण्याची संधी होती, पण दुर्दैव आड आले. त्यांच्या जागी कर्तारसिंग यांची शेवटच्या क्षणी निवड झाली. भारतीय संघासोबत कदाचित ते असते तर तेव्हाच भारतीय महिलांना पहिले पदक जिंकता आले असते. त्या संघातील बहुसंख्य मुली या सतिंदर-लीला वालिया यांच्या मार्गदर्शनाखालीच तयार झालेल्या होत्या.

स्वतः अष्टपैलू असल्यामुळे त्यांनी पारखी नजरेतून देशभरातील गुणवत्तावान मुली अचूक हेरल्या. त्यांना रेल्वेत नोकरी देतानाच भविष्यात भारतीय संघासाठी खेळाडू म्हणून घडविण्याचे काम या दोघांनी हाती घेतले. या दोघांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच रेल्वेचे संघ तयार झाले, त्यातून असंख्य खेळाडू भारतीय संघात खेळू लागल्या.

सतिंदर त्याबद्दल म्हणतात की, आम्ही दोघेही राष्ट्रीय क्रीडा संस्थेचे प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू आहोत. १९७७मध्ये आम्ही रेल्वेचा संघ उभा करण्यास सुरुवात केली. राष्ट्रकुल स्पर्धेतही भारतीय संघात १५ मुली या रेल्वेतल्या होत्या. तेव्हा आम्ही सुवर्ण जिंकलो होतो. आम्ही नव्या आणि गुणवत्तावान मुलींना शोधून आणत असू. सबा अंजुमसारखी खेळाडू आम्हाला सापडली. तेव्हा तिला रेल्वेत नोकरी मिळाली, पण तेव्हा ती दहावीदेखील झालेली नव्हती. रेल्वेमंत्र्यांच्या विशेष परवानगीने तिला नोकरी देता आली. १९८२ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या मुलींच्या संघाने सुवर्ण जिंकले तेव्हा तर १३ मुली रेल्वेच्याच होत्या त्यातील ७ मुली तर पश्चिम रेल्वेकडून खेळत होत्या.

सतिंदर आणि लीला वालिया यांनी अशा गुणवान मुलींना हेरून माटुंग्यातील आपल्या रेल्वे क्वार्टरमध्ये आणले. तिथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. नोकरी मिळेपर्यंत त्या मुली तिथे राहात. त्या मुलींच्या पालकांचाही या दांपत्यावर प्रचंड विश्वास होता.

आम्ही मणिपूर, झारखंड, ओरिसा, केरळमधून गुणवत्तावान मुली आणल्या. राजस्थानात हॉकी नव्हती, पण तिथूनही तीन मुली खेळल्या. वर्षा सोनी, गंगोत्री भंडारी अशा खेळाडू विद्यापीठ हॉकीतून पुढे आल्या. रेल्वे नोकरी देत असल्यामुळे मुली खेळत. मिराबाई चानू हीदेखील रेल्वेचीच खेळाडू आहे. रेल्वेने नेहमीच खेळाडू आणि खेळांना पाठिंबा दिला, सतिंदर सांगतात.

दादोजी कोंडदेव पुरस्काराने सन्मानित सतिंदर यांनी केलेल्या क्रीडाक्षेत्रातील कार्याची पोचपावती म्हणून त्यांचा ध्यानचंद पुरस्कारासाठी विचार नक्कीच करता येईल.

सतिंदर सांगतात की, विविध राज्यातील गुणवान मुलींना एकत्र आणून त्यांचा संघ तयार करणे ही आमची आवड होती. त्यासाठी आम्ही दोन दोन वर्षे त्या मुलींच्या खेळावर, त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवत असू. विद्यापीठ स्पर्धा असली की आम्ही तिथे जात असू. कुणी नोकरीसाठी एखाद्या चांगल्या खेळाडूविषयी विचारले तर आम्ही अशा गुणवत्तावान मुलींची नावे सुचवत असू. आम्ही चांगल्या खेळाडूच सुचविणार हा लोकांचा आमच्यावर विश्वास होता.

तेव्हा मुलींना आठवड्यातील सहा दिवस प्रशिक्षण दिले जात असे. मुली म्हणत की, एवढे ट्रेनिंग कशासाठी. पण मी त्यांना म्हटले की, थांबा आणि पाहा काय होते ते? १९७७ राष्ट्रीय आंतररेल्वेत आमच्या ७-८ मुली निवडल्या गेल्या. पुढे राष्ट्रीय शिबिरातही त्यांची निवड झाली तेव्हा त्यांना फिटनेसचे महत्त्व कळले. तोच फिटनेस आजच्या या संघातही दिसतो आहे. त्यामुळेच आपण उपांत्य फेरीपर्यंत धडक मारू शकलो.

हे ही वाचा:
व्वा रे व्वा! मुंबईला एक न्याय आणि पुण्याला दुसरा !

शरद पवारांनी का घेतली अमित शहांची भेट?

ठाकरे सरकार विरोधात व्यापाऱ्यांचे घंटानाद आंदोलन

हॉकीतील पराभवावर काय म्हणाले मोदी?

लीला वालिया म्हणाल्या की, तेव्हा रेल्वेत मुंबईतल्याच मुली होत्या. मी सुद्धा तेव्हा खेळत होते. १९६९मध्ये मी अखेरची राष्ट्रीय स्पर्धा खेळले. नंतर १९७४ पर्यंत रेल्वेचा मुलींचा संघच नव्हता. पण १९७७ला मी बीएड केल्यावर मला आमचे एक अधिकारी म्हणाले की, रेल्वेसाठी एक चांगला संघ तयार करा. मग आम्ही एनआयएसचा प्रशिक्षकाचा कोर्स केला. संघ बनवला. पश्चिम रेल्वेचे जे खेळाडू आम्ही आणले त्यातील ९० टक्के भारतीय संघात खेळले. त्याचे श्रेय माझ्या पतीचे आहे. नोकरी करतानाही त्यांनी हे संघ घडविले. त्यावेळी १९८२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचा संघ उत्कृष्ट होता. त्यात पश्चिम रेल्वेच्याच ७-८ खेळाडू होत्या.

Exit mobile version