रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असला तरीही बाजारपेठेत सणाचा उत्साह मात्र अजून दिसून येत नाहीये. मागील वर्षी कोरोनामुळे रक्षाबंधनावर निर्बंध होते. सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवासाला मुभा नव्हती. त्यामुळे याचा आर्थिक फटका दुकानदारांना बसला होता. या वर्षी निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाले असले तरी राखीबंधनानिमित्त होणारी भेटवस्तूंच्या दुकानातील गर्दी अजूनही कुठे दिसत नाही.
मागीलवर्षी रक्षाबंधन सण ऑनलाईन साजरा केला गेला होता. ऑनलाईनच ओवाळणी करून ऑनलाईन माध्यमातून भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. यंदाच्या वर्षी निर्बंध शिथिल झाले आहेत. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा आहे तरीही खरेदीचा उत्साह लोकांमध्ये दिसून येत नाही, असे स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
मुंबईत दंड वसुलीसाठी आता ‘ही’ नवी मोहीम
ठाकरे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकवले
मोदी सरकार रोज १०० किमी रस्ते बांधणार
भारत-इंग्लंड दुसरा कसोटी सामना आजपासून
कोरोनाचे संकट येण्यापूर्वी २०१९ मध्ये रक्षाबंधनाची खरेदी ही १५ दिवस आधीपासून उत्साहात सुरू होत असे. खरेदीसाठी गर्दी होत असे. साधारण १०१ रुपये ते १००१ रुपयांपर्यंतच्या भेटवस्तू लोक खरेदी करत असत. भेटवस्तू खरेदीसाठी दिवसाला ६० ते ८० ग्राहक येत आणि शेवटच्या दोन दिवसांत ही संख्या शंभर पर्यंतही जात असे. मात्र मागीलवर्षी कोरोनामुळे २० टक्केसुद्धा विक्री झाली नाही. यावर्षी देखील केवळ १५ ते २० टक्केच ग्राहक खरेदीसाठी येत आहेत, असे दादर भागातील लहान भेटवस्तूंची विक्री करणारे ताराचंद डोईफोडे यांनी सांगितले. पाचशे रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भेटवस्तूंची जास्त खरेदी होत नाही. लोकांचे बजेट कमी झाल्याचे निरीक्षणही डोईफोडे यांनी केले.
राखीच्या किमतीही या वर्षी वाढल्या आहेत. मागीलवर्षी १२ रुपये डझन असणाऱ्या ‘देव राखी’ यावर्षी २० रुपयाने बाजारात आहेत. अन्य राख्यांची कमीत कमी किंमत १० रुपये होती ती आता १५ रुपये झाली आहे. व्यवसाय कमी असल्याने किंमती वाढल्याचे व्यावसायिक सांगतात.
वेगवेगळ्या डिजिटल माध्यमातून कूपन्सच्या मदतीने हवी ती खरेदी ऑनलाईन करता येते. कोरोनाची टांगती तलवार डोक्यावर असताना प्रत्यक्षात दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा अशाप्रकारे ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक वाढला आहे.