वर्सोवा ते वांद्रे या सी लिंकच्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात झाली होती. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत सी लिंकचे पाच टक्के काम पूर्ण करणे अपेक्षित होते. दिलेल्या वेळेत अपेक्षित काम पूर्ण करू न शकल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सी लिंकचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस दिली आहे. कोरोनाच्या प्रभावाचा विचार करून अधिकचा वेळ कंत्राटदाराला देण्यात आला होता.
वांद्रे वर्सोवा सी लिंक हा १७ किलोमीटरचा असून अद्याप त्याचे केवळ २ टक्केच काम पूर्ण झाले आहे. कंत्राटदाराने ३१ ऑगस्टपर्यंत ५ टक्के काम पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र अद्याप २ टक्केच काम झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सी लिंकच्या बांधकामाची जबाबदारी रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरला दिली आहे. परदेशी कंपनीच्या जोडीने रिलायन्स या सी लिंकची बांधणी करत आहे. हा सी लिंक १७ किलोमीटरचा असून आठ पदरी आहे. सी लिंक आणि इतर गोष्टींवर ११ हजार ३३२ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. त्यातील सी लिंकसाठी ६ हजार ९९४ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.
हे ही वाचा:
पद्मश्री सोनम वांग्याल यांना शिखर सावरकर जीवनगौरव
ऑलिम्पिकनंतर भारताचे लक्ष आता पॅरालिम्पिक पदकांकडे
महेश मांजरेकरांना कर्करोगाचे निदान
सोशल मीडियावर सापांशी ‘मैत्री’ नको!
सध्या वांद्रे ते वर्सोवा प्रवासाला ५० मिनिटांचा वेळ लागतो, मात्र सी लिंकमुळे या प्रवासासाठी १५ मिनिटे लागणार आहेत. सी लिंक वांद्रे येथील कार्टर रोड इथून जुहू मार्गे वर्सोवाला पोहचेल. गर्दीच्या वेळेला वांद्रे ते वर्सोवा प्रवासासाठी हजारोंच्या संख्येने वाहने रस्त्यावर असतात. सी लिंक मुळे प्रवास सुखकर होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वांद्रे वरळी सी लिंक बांधला आहे. आता तसाच दुसरा सी लिंक बांधल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र उशिराने होत असलेल्या कामांमुळे प्रवाशांना अजूनही वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे.