फ्रान्सने सोमवारी आपल्या घटनेत गर्भपाताचा अधिकार समाविष्ट करत मोठा निर्णय घेतला. सोमवारी फ्रान्सच्या दोन्ही सर्वोच्च सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात यासंदर्भातल्या ऐतिहासिक विधेयकाला मंजूरी देण्यात आली. त्यामुळे महिलांना गर्भपाताचा घटनात्मक अधिकार मिळाला आहे. विशेष म्हणजे हा अधिकार देणारा फ्रान्स हा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर यासंदर्भातील प्रस्ताव मांडला होता.
अधिवेशनात महिलांना गर्भपाताचा घटनात्मक अधिकार देणारा प्रस्ताव ७८० विरुद्ध ७२ अशा फरकाने मंजूर करण्यात आला. यावेळी उपस्थित महिला लोकप्रतिनिधींनी विधेयकाच्या बाजूने पूर्ण समर्थन देत आनंद व्यक्त केला. जागतिक महिला हक्क गटांनीही याचे स्वागत केले. तसेच, विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या सर्व सदस्यांनी हे विधेयक मंजूर होताच बराच काळ उभं राहून विधेयक मंजुरीच्या निमित्ताने स्टँडिंग ओवेशनही दिले.
महिलांना गर्भपाताचा अधिकार बहाल करण्यासाठी फ्रान्सच्या राज्यघटनेच्या कलम ३४ मध्ये सुधारणा करणारं विधेयक मांडण्यात आलं होतं. नॅशनल असेम्ब्ली आणि सिनेट या फ्रान्सच्या संसदेतील दोन्ही सभागृहांनी स्वतंत्रपणे हे सुधारणा विधेयक बहुमताने पारित केलं होतं. मात्र, या विधेयकावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीमध्ये तीन पंचमांश इतक्या बहुमताची आवश्यकता होती. त्यानुसार सोमवारी झालेल्या संयुक्त बैठकीत या विधेयकावर बहुमताने शिक्कामोर्तब करण्यात आलं. हा प्रस्ताव ७८० विरुद्ध ७२ अशा फरकाने मंजूर करण्यात आला.
हे ही वाचा:
सनातन धर्मावरील टिपण्णीवरून स्टॅलिनना न्यायालय म्हणाले, तुम्ही काय बोलता तुम्हाला कळते का?
भाजपाने चंदीगड उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली
१० लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी छत्तीसगडमध्ये ठार, जवानही हुतात्मा!
हिमाचल, लडाख, जम्मू काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी!
अमेरिकेत अशाच प्रकारच्या विधेयकावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. अशातच फ्रान्समध्ये हे विधेयक बहुमताने मंजूर होणं महत्त्वाचं मानलं जात आहे. दरम्यान, या विधेयक मंजुरीचा जल्लोष संपूर्ण फ्रान्समध्ये झाला तर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याची भावना महिलांकडून व्यक्त करण्यात आली. याशिवाय महिलांना गर्भपात करण्याचा घटनात्मक अधिकार देणारा फ्रान्स हा जगातील एकमेव देश ठरला आहे. यानुसार, गर्भपात करण्याचा निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य महिलांना देण्यात आलं आहे.