लसीकरणाच्या घोषणेची ‘मोफत’ डोकेदुखी

लसीकरणाच्या घोषणेची ‘मोफत’ डोकेदुखी

बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगड, केरळ, गोवा, हिमाचल, जम्मू-काश्मीर आदि राज्यांनी मोफत लस देण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातही मोफत लस देण्याची घोषणा झाली. मात्र ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर त्यातून नवा संभ्रम निर्माण होऊन फुकटची डोकेदुखी वाढली आहे.
ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे राज्यातील सर्वांनाच मोफत लस दिली जाईल, अशी घोषणा केली. त्याच घोषणेची पुनरावृत्ती ट्विटरद्वारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही केली. पण थोड्याच कालावधीत आदित्य ठाकरे यांनी हे ट्विट रद्द केले.

हेही वाचा:

गुजरातहून महाराष्ट्रात येणार ४४ टन ऑक्सिजन

ठाकरे सरकारने या चार गोष्टी केल्या असत्या तर…

फायर ऑडिटचे गांभीर्यच नाही!

बीपीसीएल परिसरात जम्बो कोविड सेंटरला मोदी सरकारची परवानगी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मेपासूम १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाईल, अशी घोषणा केली. कदाचित, १ मे या महाराष्ट्रदिनी महाराष्ट्रात सर्वांना मोफत लस देण्याची तयारी ठाकरे सरकार करत असेल. मात्र राज्यातील या मंत्र्यांच्या घोषणेमुळे हा संभ्रम उडाला आहे.

‘राज्य सरकारकडून मोफत लसीकरण करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अधिकृत लसीकरण धोरणाबाबत गोंधळ होऊ नये म्हणून मी पूर्वीचे ट्विट हटवले आहे’ असा खुलासा आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे यांनी ५ वाजून २५ मिनिटांनी केलेल्या ट्विटमध्ये राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाईल, अशी घोषणा करताना हे आमचे कर्तव्य आहे, असे म्हटले होते. पण नंतर ५ वाजून ५२ मिनिटांनी त्यांनी दुसरे ट्विट करत आधीचे ट्विट रद्द केल्याचे सांगितले. राज्याच्या लसीकरण धोरणाबाबत गोंधळ उडू नये म्हणून ट्विट रद्द केल्याचे त्यांनी म्हटले होते. आता यातून नवा संभ्रम निर्माण झाला आहे की, खरोखरच ही घोषणा झाली आहे अथवा विचार सुरू आहे. शिवाय, ही मोफत लस सरसकट सर्वांनाच मोफत आहे की, केवळ १८ ते ४५ या वयोगटातील लोकांसाठीच ती मोफत आहे? नवाब मलिक यांचे ट्विट मात्र अजून रद्द झालेले नाही.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी लसीकरणासाठी जागतिक निविदा मागविणार असल्याची घोषणा केली आहे. त्यातून आता लसीकरण मोहीमेला राज्यात सुरुवात होण्याचे संकेत आहेत. पण आता यात खरे काय हा प्रश्न आहे.

 

Exit mobile version