भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूंबाबत अमेरिकी राजदूतांकडून शोक

भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूंबाबत अमेरिकी राजदूतांकडून शोक

अमेरिकेत भारतीय वंशाचे नागरिक आणि विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक ग्रॅसेट्टी यांनी शुक्रवारी शोक व्यक्त केला. ‘अमेरिका ही अभ्यासासाठी सुंदर आणि राहण्यासाठी सुरक्षित जागा आहे, हे भारतीयाला माहीत आहे, त्यासाठी अमेरिकी सरकार वचनबद्ध आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

‘नुकत्याच झालेल्या या घटनांबद्दल आम्हाला अतीव दुःख झाले आहे. मग ते कोणाचा जीव घेणारी दुर्घटना असो किंवा हिंसाचाराची घटना… मग ते कोणीही असो. आम्हाला यामुळे अतीव दुःख झाले आहे. आम्ही हे सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहोत की भारतीयांना हे माहीत आहे की, अमेरिका हे अभ्यासासाठी अद्भुत आणि राहण्यासाठी एक सुरक्षित ठिकाण आहे. जगातील कोणत्याही देशापेक्षा आमच्याकडे अमेरिकेत शिकणारे भारतीय जास्त आहेत,’ असे गार्सेट्टी म्हणाले.

‘आम्हाला कल्पना आहे की, काही शोकांतिका घडतील. आम्ही त्यासाठी भारत सरकारसोबत एकत्र काम करू आणि हे सुनिश्चित करणे ही आमची जबाबदारी आहे. लोकांना माहीत आहे की ते काय करू शकतात. यापैकी कोणत्याही शोकांतिकेत कुटुंबांला मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत,’ असे ते म्हणाले.

७ फेब्रुवारी रोजी हैदराबादच्या आणि इंडियाना वेस्लेयन विद्यापीठात पदव्युत्तर पदवी घेत असलेल्या सय्यद मजहिर अली याच्यावर हल्ला झाला. शिकागोमध्ये सशस्त्र चोरांनी त्याचा फोन लुटला. गेल्या आठवड्यात बी श्रेयस रेड्डी हा भारतीय वंशाचा विद्यार्थी ओहायोमध्ये मृतावस्थेत आढळला होता. न्यू यॉर्कमधील भारतीय मिशनने रेड्डी यांच्या मृत्यूची कबुली दिली. ५ फेब्रुवारी रोजी इंडियानाच्या पर्ड्यू विद्यापीठातील डॉक्टरेटचा विद्यार्थी समीर कामथ याचा मृतदेह जंगलात आढळून आला. तथापि, नंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे उघड झाले. आणखी एक पर्ड्यूमधील १९ वर्षीय नील आचार्य हा विद्यार्थी काही दिवसांपासून बेपत्ता होता. तो पर्ड्यू विद्यापीठ वेस्ट लाफायेट कॅम्पसमध्ये मृतावस्थेत आढळला.

हे ही वाचा:

  ईडीच्या कारवाईविरोधात वानखेडे यांची उच्च न्यायालयात धाव

सलमान खुर्शीद यांच्या पत्नीसमोरील अडचणींत वाढ

पोकरचा हरलेला डाव…

गाझा युद्धात इस्रायलचे पुढील लक्ष्य रफा

या वर्षाच्या सुरुवातीला, जॉर्जियामध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विवेक सैनी या २५ वर्षीय भारतीय व्यक्तीवर तो काम करत असलेल्या स्टोअरमध्ये एका बेघर व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात त्या व्यक्तीने सैनीला हातोड्याने ५० वेळा मारले, हा निर्घृण प्रसंग व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. गेल्या आठवड्यात लोकसभेला माहिती देण्यात आली की, २०१८पासून परदेशात भारतीय विद्यार्थ्यांच्या विविध कारणांमुळे मृत्यूच्या एकूण ४०३ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये नैसर्गिक कारणे, अपघात आणि वैद्यकीय परिस्थितीची कॅनडामधील ९१ प्रकरणे असून ब्रिटनमधील ४८ प्रकरणे आहेत.

Exit mobile version