रेल्वे प्रवाशांना हवे मास्क आणि सॅनिटायझर

रेल्वे प्रवाशांना हवे मास्क आणि सॅनिटायझर

कोविड-१९ महामारीमुळे गेले कित्येक महिने रेल्वे सामान्य नागरिकांकरिता बंद आहे. तरीही, रेल्वेने प्रवास करू शकणाऱ्या काही प्रवाशांच्यामते रेल्वे स्थानकांवर मास्क आणि सॅनिटायझरची विक्री करण्यात यावी. सध्याच्या काळात १६ लाख ते १८ लाख प्रवासी रेल्वे सेवेचा लाभ घेतात. या प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायझर रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून देण्यात यावे असे म्हटले आहे.

रामशरण काशी दुबे या रेल्वे प्रवाशाने सांगितल्यानुसार, गाड्यांत गर्दी असते. त्यामुळे आम्ही हँडलबार, सीट्स यांना स्पर्श करतो. एखाद्या प्रवाशाला जर हात स्वच्छ करायची इच्छा असेल तर त्याला घरून सॅनिटायझर बाळगावा लागतो. त्यामुळे कमी दरातल्या, लहान आकाराच्या सॅनिटायझरच्या बाटल्या रेल्वेने स्थानकांवर उपलब्ध करून द्याव्यात.

श्वेता कुलकर्णी या महिला प्रवासीने सांगितले की, मी दररोज ₹५० किंमतीची सॅनिटायझरची छोटी बाटली सोबत बाळगते. रेल्वेने या बाटल्या स्थानकांवर उपलब्ध करून द्याव्यात, कारण जर सॅनिटायझरची गरज पडली, तर रेल्वे स्थानकाबाहेर जाऊन केमिस्टचे दुकान शोधावे लागते.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या रेल्वे स्थानकावरील दुकाने बंद आहेत. परंतु रेल्वेने हेल्थ एटीएमची सोय केलेली आहे. हेल्थ एटीएम म्हणजे वेंडिंग मशीन्स आहेत ज्या मार्फत प्रवाशांना मास्क आणि सॅनिटायझर पुरवले जातील. सध्या मोठ्या स्थानकांवर ही एटीएम लावण्यात आली आहेत. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, यापूर्वीच लोकमान्य टिळक टर्मिनल, कल्याण, ठाणे यांसारख्या टर्मिनलवर ही एटीएम लावण्यात आलेली आहेत. या व्यतीरिक्त १२ इतर स्थानकांवर ही यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा रोड, चेंबूर, पनवेल, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, डोंबिवली, बदलापूर या स्थानकांचा विचार करण्यात आला आहे.

Exit mobile version