खैबर पख्तुनख्वा या पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात इम्रान खान यांच्या रॅलीदरम्यान ‘ईश्वरनिंदा’ केल्याबद्दल संतप्त जमावाने एका पाकिस्तानी मौलवीची हत्या केल्याची घटना शनिवारी घडली.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाने शनिवारी रात्री मर्दानमधील सावलधेर गावात सभा आयोजित केली होती. त्यावेळी निगार आलम या स्थानिक मौलवीला रॅलीत भाषण देण्यास सांगण्यात आले होते. याच ठिकाणी एप्रिल २०१७मध्ये मशाल खान या विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला अशाच ईश्वरनिंदेच्या आरोपावरून सहकारी विद्यार्थ्यांनी ठार मारले होते.
मेळाव्याचा समारोप होत असताना ‘ईश्वरनिंदा’ केल्याबद्दल आलम या मौलवीची शेकडोंच्या जमावाने हत्या केली. ‘जमाव आलमवर हल्ला करणार, हे जेव्हा आम्हाला दिसले, तेव्हा आम्ही त्याला जवळच्या बाजारपेठेतील दुकानात घेऊन गेलो. परंतु लोक दुकानात घुसले आणि त्याच्यावर लाथा-बुक्क्यांनी हल्ला करू लागले,” असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक रोखानजेब खान यांनी सांगितले.
हे ही वाचा:
अमृतसरमध्ये पुन्हा स्फोट, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त
नेपाळी शेर्पांना आता नकोशी झाली आहे पर्वतराजींची वाट!
संस्कृत, काश्मिरी, कोकणी भाषांमध्ये शब्दकोश प्रकाशित होणार
सुदानमधून आलेले भारतीय मोदींच्या प्रेमात
यात आलमचा जागीच मृत्यू झाला. या मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पोलिस या मौलवीचे संतप्त जमावापासून रक्षण करण्याचे निष्फळ प्रयत्न करताना दिसत आहेत. पीटीआयचे नेते खान रॅलीला उपस्थित नव्हते. तर, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
‘ईश्वरनिंदा’ हा पाकिस्तानमधील संवेदनशील मुद्दा आहे. सामाजिक न्याय केंद्राच्या मते, १९८७पासून पाकिस्तानमधील दोन हजारांहून अधिक लोकांवर ईश्वरनिंदा केल्याचा आरोप आहे. तर, किमान ८८ जणांची जमावाने हत्या केली आहे.