अमली पदार्थांच्या तस्करीत अडकवली गेलेली आणि शारजामध्ये तुरुंगवास भोगावा लागलेली अभिनेत्री क्रिसन परेरा सोमवारी मुंबईत परतण्याची शक्यता आहे. शारजाचे न्यायालय सोमवारी तिच्या प्रकरणावर सुनावणी घेणार आहे. तेव्हा तिची सुटका करण्याच्या आणि तिचा पासपोर्ट परत करण्याच्या भारताच्या विनंतीवर न्यायालय निर्णय घेईल. क्रिसनचा पासपोर्ट जप्त करण्यात आला असून तिची जामिनावर तात्पुरती सुटका करण्यात आली आहे.
तिचा पासपोर्ट तिला परत केला गेल्यास ती सोमवारी रात्री उशिरा मुंबईत परतेल. परेराचे पालक आणि तिच्या भावाने शुक्रवारी पोलिस सहआयुक्त लक्ष्मी गौतम आणि उपायुक्त के. के. उपाध्याय यांची भेट घेऊन त्यांनी या प्रकरणात मदत केल्याबद्दल आभार मानले.
मुंबई पोलिस आता याआधी अशाच प्रकारे अडकवण्यात आलेल्या आणि सध्या शारजा येथील तुरुंगात असलेल्या क्लेटन रॉड्रिग्ज याच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार आहेत. क्लेटन याला फेब्रुवारी महिन्यात शारजा पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा त्याच्याकडे आढळलेल्या केकमध्ये अमली पदार्थांचे घटक आढळले होते. तसेच, त्याच्याकडे आणखी ५० किलो अमली पदार्थ असल्याची खबरही शारजा पोलिसांना मिळाली होती.
हे ही वाचा:
कुस्तीगीरांच्या आंदोलनात राजकारण शिरले; प्रियांका गांधींनी घेतली खेळाडूंची भेट
निवासी, अनिवासी मालमत्ता विकून मिळाला १० वर्षातला विक्रमी महसूल
सत्यपाल मलिक यांच्यावर पाच तास प्रश्नांची सरबत्ती
सुदानमधून आलेले विमान उद्ध्वस्त झालेल्या धावपट्टीवर उतरले
यामध्येही क्रिसन प्रकरणातील आरोपी बेकरीमालक अँथनी पॉल आणि त्याचा सहकारी राजेश बोभाटे या दोघांचाच सहभाग होता. या संदर्भात मुंबई पोलिसांनी शुक्रवारी क्लेटनच्या पत्नीचा जबाब नोंदवला. त्यानुसार, या प्रकरणांत नवीन गुन्हा दाखल करता येईल का, याची पोलिस चाचपणी करणार आहेत. या संदर्भातील कागदपत्रांची जुळवाजुळव पोलिसांकडून सुरू आहे.
क्लेटनचे प्रकरण पुढील आठवड्यातच शारजा येथील न्यायालयासमोर सुनावणीसाठी येणार आहे. क्लेटनची पत्नी न्यायालयात परेराची बाजू मांडणाऱ्या वकिलांची मदत घेणार आहे. त्यामुळे तीही तिच्या पतीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी सोमवारी शारजा येथे निघणार आहे.