चिन्मय दास यांच्या जामीन सुनावणीची तारीख बदलण्याची याचिका फेटाळली

बांगलादेशातील न्यायालयाने दिला निर्णय

चिन्मय दास यांच्या जामीन सुनावणीची तारीख बदलण्याची याचिका फेटाळली

बांगलादेशातील एका न्यायालयाने अटक करण्यात आलेले हिंदू पुजारी चिन्मय कृष्ण दास यांच्या जामीन सुनावणीची तारीख बदलण्याची याचिका फेटाळून लावली आहे. बांगलादेश संमिलितो सनातनी जागरण जोतेचे प्रवक्ते चिन्मय कृष्ण दास यांनी बुधवारी याचिका सादर करणाऱ्या वकिलाला अधिकार दिलेला नाही, असे नमूद करून न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली.

बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आणि मानवाधिकार कार्यकर्ते रवींद्र घोष यांनी चितगाव येथे जाऊन चिन्मय कृष्ण दास यांच्यासाठी न्यायालयात याचिका सादर केली. “चिन्मय कृष्ण दासच्या जामीन सुनावणीसाठी लवकर तारीख निश्चित करण्यासाठी मी चितगाव न्यायालयात अर्ज केला परंतु, त्यावेळी सुमारे ३० वकील न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोर्टरूममध्ये घुसले आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला,” असे रवींद्र घोष यांनी एएनआयला फोनवरून सांगितले. “ते मला इस्कॉनचा एजंट, चिन्मय यांचा एजंट म्हणून टोमणा मारतात. मी इथे का आलो हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. ते म्हणतात, एका वकिलाची हत्या झाली. ते मला खुनी म्हणतात. मी वकील म्हणून आलो. मी कसा खुनी आहे!” असेही ते पुढे म्हणाले.

“न्यायाधीशांनी त्या वकिलांना फटकारले आणि पोलीस उपस्थित असल्याने ते माझ्यावर हल्ला करू शकले नाहीत,” असे रवींद्र घोष म्हणाले. वकिलाच्या नावावर खुनाचा गुन्हा दाखल असल्याने चिन्मयचे वकील सुनावणीला उपस्थित राहू शकले नाहीत, असा युक्तिवाद घोष यांनी केला. घोष यांनी त्यांच्या वतीने अर्ज केला. “माझी याचिका फेटाळल्यानंतर, मी तुरुंगात गेलो आणि चिन्मय यांच्याकडून त्यांची केस हाताळण्याचे अधिकार घेतले. तुरुंग अधीक्षकांनी पॉवरच्या प्रतीवर पुष्टी केली आहे. मी गुरुवारी पुन्हा न्यायालयात अर्ज करेन,” अशी माहिती घोष यांनी दिली.

हे ही वाचा : 

कपूर कुटुंबीय पंतप्रधानांच्या भेटीला!

जोडे पूजण्यासाठी, जोडेपुशे म्हटले; जोड्यांनी मार खाल्ला…

काबुलमध्ये झालेल्या स्फोटात अफगाणिस्तानचे निर्वासित मंत्री ठार

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण, पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल!

इस्कॉनचे माजी पुजारी चिन्मय कृष्ण दास यांना २५ नोव्हेंबर रोजी देशद्रोहाच्या आरोपाखाली पोलिसांनी ढाका विमानतळावरून अटक केली होती. २६ नोव्हेंबर रोजी बांगलादेशच्या बंदर शहर चितगाव येथील न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळत त्याला तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या जेल व्हॅनसमोर ठिय्या मांडला आणि ताफा अडवला. आंदोलकांशी झटापट झाल्यानंतर या संघर्षात सैफुल इस्लाम अलिफ नावाचा वकील ठार झाला. चिन्मय यांची बाजू मांडण्यासाठी वकील नसल्यामुळे चितगाव न्यायालयाने ३ डिसेंबर रोजी जामीन सुनावणीसाठी २ जानेवारीची तारीख निश्चित केली होती.

Exit mobile version