चीनचे रॉकेट मालदीवजवळ कोसळले

चीनचे रॉकेट मालदीवजवळ कोसळले

चीनचे एक मोठं अनियंत्रित रॉकेट ‘द लॉन्ग मार्च ५बी’ आता हिंदी महासागरात कोसळलं असल्याचं वृत्त चीनच्या स्टेट मीडियाने दिले आहे. त्यामुळे हे रॉकेट आता कुठे कोसळणार याच्या अफवांना आळा बसला आहे तसेच जगाची चिंताही मिटली आहे. हिंदी महासागरात कोसळण्याच्या आधी या रॉकेटचे बहुतांश भाग हे जळून नष्ट झाले होते.

चीनच्या स्टेट मीडियाने सांगितलं  आहे की, ‘द लॉन्ग मार्च ५बी’ च्या अवशेषांनी बीजिंगच्या प्रमाणवेळेनुसार, १० वाजून २४ मिनिटांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला होता. नंतर या रॉकेटचे अवशेष ७२.४७ डिग्री पूर्व अशांश आणि २.६५ डिग्री उत्तर रेखांश या ठिकाणी पडले. हे ठिकाण मालदीवच्या पश्चिमेला काही अंतरावर आहे.

पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना या रॉकेटचा बहुतांशी हिस्सा जळून खाक झाल्याची माहिती चीनच्या स्टेट मीडियाने दिली आहे. जवळपास १०० फुट लांब असलेले हे रॉकेट चार मैल प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीकडे प्रवास करत होतं. चीनने या रॉकेटच्या मदतीने अंतराळात तयार करण्यात येत असलेल्या स्पेस स्टेशनचा पहिला भाग पाठवला होता. चीन तियान्हे नावाचे एक स्पेस स्टेशन अवकाशात उभं करत आहे.

हे ही वाचा:

स्वतःच्या मुलाला मंत्री केलंत, तसंच आता बहुजनांच्या मुलांच्या नियुक्त्या करा

सावरकर म्हणाले, हा प्रश्न म्हणजे दुसऱ्या बाजीरावानंतर कोण या प्रश्नासारखा वाटतो!

पाक समर्थक इम्रान खानला अमेठीत अटक

शिवसेनेच्या प्रदीप शर्मांवरही आता खंडणीचा आरोप

या रॉकेटचे तुकडे नेमके कुठे आदळणार याची माहिती नसल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांत कुठेतरी हे रॉकेट पडेल अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली होती. तसेच जास्तीत जास्त समुद्रात हे रॉकेट पडावे यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. आता हे रॉकेट हिंदी महासागरात पडल्याने जगाची चिंता मिटली आहे.

Exit mobile version