चीनने भारताच्या एका भागात चीनचा ध्वज फडकावाल्याचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. गलवान भागात हा ध्वज फडकावल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, हा ध्वज पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी गलवानमध्ये फडकवला नसून ती वेगळी जागा आहे. त्या जागेवरून कोणतेही वाद नसल्याचे वृत्त ‘टाइम्स नाऊ’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
चीनच्या प्रसार माध्यमांनी पीएलएचे सैनिक एका ठिकाणी ध्वज फडकावत असतानाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओवर २०२२ च्या नवीन वर्षाच्या दिवशी गलवान व्हॅलीमध्ये चीनचा राष्ट्रीय ध्वज फडकतो आहे, अशा आशयाचा संदेश होता. पीएलएच्या सैनिकांनी चीनच्या हद्दीत नवीन वर्ष साजरे केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
मात्र, या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर देशातील काही लोकांनी यावरून मोदी यांच्यावर टीका केली आहे. गायक आणि संगीतकार विशाल ददलानी यांनीही हा व्हिडीओ पाहून थेट चीनने भारताची भूमी काबीज केली आहे, असे म्हणत मोदी यांच्यावर टीका केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून ददलानी यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.
हे ही वाचा:
जागा दाखवणाऱ्या राष्ट्रवादीलाच कंद यांनी दाखविली जागा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण
ओएनजीसीची जबाबदारी पहिल्यांदा महिलेकडे
या पोलिसांनाही करता येणार ‘वर्क फ्रॉम होम’
चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये १५ जून २०२० रोजी गलवान येथे झालेल्या चकमकीत २० भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही चीनने त्यांचे किती सैनिक मारले गेले याची अधिकृत माहिती दिली नव्हती. तसेच हा संघर्ष भारतीय सैन्याने चीनच्या भूभागावर अतिक्रमण केल्यामुळे घडल्याचे चीनकडून सांगण्यात आले. मात्र, यावार भारत सरकारने कठोर भूमिका घेत सप्टेंबर २०२१ मध्ये स्पष्टपणे सांगितले की, चीनचे आक्रमक वर्तन आणि पूर्व लडाखमधील स्थिती बदलण्याच्या एकतर्फी प्रयत्नांमुळे दोन्ही देशांमधील शांतता बिघडली आहे.