पॉम्पेओ यांना चीनबंदी

पॉम्पेओ यांना चीनबंदी

चीनच्या सरकारने बुधवारी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमधल्या २८ अधिकाऱ्यांवर निर्बंध लादले आहेत. यामध्ये माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर दोन माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन आणि रॉबर्ट ओब्रायन यांचाही समावेश या यादीत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय हे चीन आणि अमेरिकेतील संघर्ष वाढवणारे ठरले. परराष्ट्र मंत्री पॉम्पेओ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोल्टन हे या निर्णयांमध्ये आघाडीवर राहिलेले आहेत. चीनबरोबरच्या संबंधांमध्ये अनेक वेळा पॉम्पेओ यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षावर कडाडून टीका केली होती.

“या २८ अधिकाऱ्यांनी चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आणि त्यांच्यामुळे चीन अमेरिका संबंध लयाला गेले.” अशी माहिती एका परिपत्रकातून चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. मंत्रालयाने पुढे असेही सांगितले की, “या सर्व व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती यांना चीन, हॉंगकॉंग आणि मकाऊमध्ये प्रवेश करायला बंदी घातली आहे. त्याचबरोबर त्यांच्याशी निगडित सर्व कंपन्यांना चीन, हॉंगकॉंग आणि मकाऊमध्ये व्यवहार करण्यासही बंदी घातली आहे.

ट्रम्प यांनी जाता जाता चीनमधील शिंजियांग भागात सुरु असलेल्या नरसंहाराप्रकरणी चीनवर निर्बंध लादले होते. त्याचा बदला म्हणून बायडन यांच्या शपथविधीच्या दिवशीच चीनने हे पाऊल उचलल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

Exit mobile version