लोकसंख्येच्या बाबतीत जगात क्रमांक एकचा देश असणाऱ्या चीनने आपल्या अपत्य धोरणात बदल केला आहे. या नव्या बदलानुसार आता चीनी दांमत्य दोन ऐवजी तीन अपत्यांना जन्म देऊ शकतात. चीनच्या सत्ताधारी असणाऱ्या चीनी कम्युनिस्ट पक्षाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चीनी पाॅलिटब्युरोच्या बैठकीनंतर चीन सरकारकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
चीनची लोकसंख्या जगात सर्वाधिक असली तरीही सध्या चीन लोकसंख्येच्या बाबतीत काही आव्हानांचा सामना करताना दिसत आहे. दर दहा वर्षांनी चीनमध्ये जनगणना होत असते. गेल्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये चीनची जनगणना करण्यात आली. २०२० च्या जनगणनेनुसार चीनमध्ये जन्मदर हा कमालीचा मंदावलेला दिसत आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये केवळ १ कोटी २० लाख नवजात बालकांचा जन्म झाल्याचे वास्तव समोर आले आहे. १९६० नंतरची ही एका वर्षात जन्मलेल्या बालकांची सर्वात कमी आकडेवारी आहे. चीनसाठी ही चिंतेची बाब समजली जात आहे. चीनचा खालावलेला जन्मदर हा चायनीज सरकारसाठी डोकेदूखी ठरताना दिसत आहे. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी चीनच्या पाॅलिटब्युरोची अत्यंत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकी नंतरच सरकारकडून अपत्य धोरणात बदल करायचा निर्णय घेतला गेला आहे. त्यानुसार आता चीनी पालकांना ३ अपत्ये जन्माला घालायची परवानगी असेल.
हे ही वाचा:
काँग्रेस नेत्याची आता थेट भोसले राजघराण्याकडून वसूली
स्पुतनिकची पहिली खेप आज भारतात पोहोचणार
काल पवारांची भेट, आज खडसेंच्या घरी, फडणवीसांच्या भेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण
भारताने फटकारल्यानंतर डब्ल्यूएचओने कोरोना उपप्रकाराचे नाव बदलले
यापूर्वी २०१६ साली चीनने आपल्या अपत्य धोरणात बदल केला होता. त्याआधी चीनमध्ये एका अपत्त्याला परवानगी होती. पण २०१६ साली यात बदल करण्यात आला. चीनने एक अपत्य धोरण संपवून नागरिकांना दोन अपत्य जन्माला घालण्याची परवानगी दिली होती. तर आता अवघ्या पाच वर्षांनी चीनने आपल्या अपत्य धोरणात पुन्हा एकदा बदल केलेला आहे. या आधी चीनमध्ये तिसरे अपत्य जन्माला घालण्यास कायदेशीर परवानगी नव्हती. तसेच तिसरे अपत्य जन्माला घालणाऱ्या पालकांवर दंडात्मक कारवाई करायची तरतूद होती.