चीन आता आपल्या विस्तारवादी धोरणाचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाच्या जवळ जाऊन पोहचला आहे. ऑस्ट्रेलियाच्या जवळ असणाऱ्या सोलोमन बेटांवर चीन आता हातपाय पसरू लागला आहे. तिथल्या पोलिसांना चिनी पोलीस ट्रेनिंग देत आहेत. चीनने आपल्या विस्तारवादी धोरणाला समोर ठेवून दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये आपलं लष्करी सामर्थ्य वाढवण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चीन आता सोलोमन बेटांपर्यंत येऊन पोहचला आहे.
सोलोमन बेट म्हणजे पॅसिफिक महासागरात ही बेटं आहेत. ऑस्ट्रेलियापासून ही बेटं जवळ आहेत. या बेटांवर आता चीन येऊन पोहचल्यामुळे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका या देशांना धोका निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सीमेपासून २ हजार किलोमीटर अंतरावर आता चीन उभा ठाकलाय. पॅसिफिक महासागरात आपले हात- पाय पसरवण्यासाठी चीनचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शिवाय चीनच्या शेजारी देशांमध्येही चीनचा प्रभाव वाढताना दिसत आहे.
चीन आणि सोलोमन बेटांमध्ये करार झाला असला तरी त्यात चीनचा कोणताही वाईट हेतू नसल्याचं चीन आणि सोलोमन दोघांकडूनही सांगण्यात येतं आहे. पण चीनने आता सोलोमनमध्ये प्रवेश केला आहे म्हणजे तो शांत बसणार नाही तर नक्कीच त्या ठिकाणी लष्करी तळ उभारण्याची सुरुवात करु शकतो त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेची चिंता वाढणार असल्याचं तज्ज्ञांच मत आहे.
चीन आणि सोलोमन यांच्यात झालेल्या कराराबाबत अशी चर्चा आहे की, सोलोमन बेटांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चीनकडून पोलिस आणि इतर लष्करी दले पाठवता येतील. याशिवाय करारानुसार गरज पडल्यास चीन आपली युद्धनौका तेथे नांगरण्यासाठी पाठवू शकतो. हा करार तेथील जनतेच्या भल्यासाठीच आहे, असं सध्या तरी चीनकडून सांगण्यात येत आहे. जगाच्या चिंतेचा विषय हा केवळ सुरक्षा करारच नाही तर सोलोमन बेटांचे पंतप्रधान हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या जवळचे मानले जातात. सध्या सोलोमन बेटांचे पंतप्रधान मनीश सोगवारे आहेत, ज्यांची अनेक धोरणं ही चीनला पाठिंबा देणारी असतात असं दिसून येत. मात्र, चीनच्या भूमिकेचा इतिहास पाहता चीनचा यात नक्कीच छुपा मनसुबा असणार असं तज्ज्ञांच मत आहे.
चीनने असंच आफ्रिकेच्या जिबूतीमध्ये लष्करी तळ उभारुन जगाला आपला मनसुबा दाखवून दिला आहे. जिबूतीमध्ये चीनने ज्याप्रकारे लष्करी स्थळ उभारलं त्यावरून लक्षात येतं की मोक्याच्या ठिकाणी चीन आपलं वर्चस्व निर्माण करू पाहत आहे. जिबूतीच्या भौगोलिक स्थानाचा विचार केला तर एका व्यस्त अशा समुद्र वाहतूक मार्गावरचा हा देश आहे. चीन आणि सोलोमन यांचा विचार करता चीन आता ऑस्ट्रेलियाच्या जवळ पोहचला आहे. शिवाय अमेरिका आणि न्यूझीलंडलाही धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांची कोंडी करण्यासाठी चीन पॅसिफिक महासागरातील १० देशांशी प्रादेशिक सुरक्षा करार करणार होता मात्र, चीनचा हा डाव फसला. मात्र, सोलोमन बेटांसोबत करार केल्यानंतर क्वाड सदस्य देशांना याचा धोका निर्माण झाला आहे. जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांना अधिक धोका निर्माण झाला असला तरी दुसरीकडे भारताची कोंडी करण्यासाठी चीनचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. त्यामुळे आता चीनच्या या खेळीनंतर ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेची भूमिका कशी असणार आहे हे येत्या दिवसात कळेलच.
हे ही वाचा:
नीरज चोप्राने मोडला स्वतःचाच विक्रम!