आंतरराष्ट्रीय पातळीवर कुरापती चीनने पुन्हा भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईवरील २६-११ च्या हल्ल्यात सहभागी असलेला दहशतवादी साजीद मीर याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करावे, या प्रस्तावाला चीनने रोख लावला. साजीद मीर हा पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आहे. भारत आणि अमेरिका या दोन देशांनी मिळून हा प्रस्ताव मांडला होता. मात्र, आता चीनच्या आडमुठी भूमिकेमुळे हा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे.
दहशतवादी हल्ल्यातील सहभागाबाबत भारताला पाहिजे असलेला आरोपी आणि पाकिस्तानातील लष्कर ए तोयबाचा दहशतवादी साजीद मीर याला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करावे, यासाठी भारत आणि अमेरिका यांनी संयुक्त राष्ट्रांत मांडलेला प्रस्ताव मंगळवार, २० जून रोजी चीनने अडवला.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल कायदा निर्बंधांनुसार मीर याला काळ्या यादीत टाकून जागतिक दहशतवादी घोषित करावे, असा प्रस्ताव अमेरिकेने भारताच्या अनुमोदनासह मांडला होता. तो मंजूर झाला असता तर, मीर यांची मालमत्ता गोठवून त्याच्यावर प्रवासबंदी लादून त्याच्या शस्त्रास्त्र व्यापाराला आळा घालता आला असता. पण, चीनने त्यात खोडा घातला. चीनने आधी हा प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याचे सप्टेंबरमध्ये स्पष्ट झाले होते. पण आता चीनने त्याला नकार दिला आहे.
मीर हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या भूमिकेसाठी अमेरिकेने त्याच्यावर ५ दशलक्षचे डॉलर्सचे इनाम ठेवले आहे.
हे ही वाचा:
‘गद्दार दिना’शी राष्ट्रवादीचा काय संबंध?
अमेरिका दौऱ्याला निघताना पंतप्रधानांनी चीनला सुनावले
रोहितचा उत्तराधिकारी म्हणून कुणालाही तयार केले नाही!
तलवारबाज भवानीला जयललितांनी दिला होता मदतीचा हात !
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी यापूर्वी मीरचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता, परंतु पाश्चात्य देशांनी त्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्याच्या मृत्यूचा पुरावा मागितला. त्यानंतर तो जिवंत असल्याचे समोर आले होते.
मीर हा पाकिस्तानस्थित लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ सदस्य असून नोव्हेंबर २००८ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. मीर हा लष्कर ए तोयबाच्या ऑपरेशन्सचा मॅनेजर होता. हल्ल्याची तयारी, नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये त्याची प्रमुख भूमिका होती.