चीन-पाकिस्तानने एकत्रितपणे विकसीत केलेले जेएफ-१७ ‘थंडर’ हे लढाऊ विमान आता पाकिस्तानला डोईजड झाले आहे. जेएफ-१७ ‘थंडर’ ची मेंटेनन्स कॉस्ट (विमान युद्धाकरता तयार राहावे यासाठी येणारा खर्च) ही नवीन विमानांच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्यामुळे खराब अर्थव्यवस्थेत हा खर्च करणे पाकिस्तानला जड जात आहे.
१९९९ मध्ये पाकिस्तान आणि चीनने एकत्रितपणे जेएफ-१७ ‘थंडर’ हे विमान विकसीत करण्याचा करार केला होता. या विमानाच्या विकासाची किंमतही दोन्ही देशांनी उचलण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडे असलेल्या मिग-२९, सुखोई सु-३०-एमकेआय आणि मिराज-२००० च्या तोडीचे हे विमान असेल अशी पाकिस्तानची अपेक्षा होती. या विमानांमध्ये पश्चिमी देशांकडे असलेली अत्याधुनिक एव्हियॉनिक्स आणि रशियन क्लिमोव आरडी ९३ इंजिन असणे अपेक्षित होते.
पेंटागॉनच्या रिपोर्टप्रमाणे लढाऊ विमानाची क्षमता ही त्या विमानाच्या एव्हियॉनिक्स, शस्त्रास्त्र आणि इंजिनच्या क्षमतेवर ठरते. जेएफ-१७ थंडर हे विमान या सर्व गोष्टींमध्ये सुमार आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करूनही पाकिस्तानचे हे विमान भारताकडे असलेल्या विमानांच्या तोडीसतोड नाही. यामुळे जेएफ-१७ थंडर हे विमान पाकिस्तानसाठी मोठ्या अडचणीचे झाले आहे. बालाकोट एअर स्ट्राईक नंतर झालेल्या भारत-पाकिस्तान हवाईदलाच्या चकमकीत जेएफ-१७ थंडर हे विमान भारताच्या सुखोई सु-३०-एमकेआय आणि मिराज-२००० समोर टिकू शकले नव्हते.