भारताविरोधी चीनच्या कुरापती अजूनही सुरूच असून अरुणाचल प्रदेशमधील सीमा भागात चीनकडून बांधकाम सुरू असल्याचे व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. अनवाज जिल्ह्यातील स्थानिकांनी संबंधित हालचालींचे फोटो आणि व्हिडीओ कैद केले आहेत. चालागम येथील हादिगरा-डेल्टा ६ या भारतीय हद्दीत असणाऱ्या लष्कराच्या चेक पोस्टजवळून हा व्हिडीओ शूट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चालागम हे भारत- चीन सीमेजवळील अरुणाचलजवळच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला म्हणजेच एलएसीला लागून असलेलं शेवटचं ठिकाण आहे.
चालागममध्ये चिनी लष्कराच्या माध्यमातून सीमेवर सुरु असणाऱ्या बांधकामाची दृष्य समोर आली आहेत. चीनच्या पिपल्स रिपब्लिक आर्मीतील सैनिक आणि बांधकामासाठी वापरली जाणारी मोठी वाहने या फोटोंमध्ये दिसत आहेत. हे फोटो, व्हिडीओ ११ ऑगस्ट २०२२ रोजीचे असल्याची माहिती ‘इंडिया टुडे’ने दिली आहे.
भारत-चीन सीमेला लागून असलेल्या स्थानिकांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनकडून वेगाने रस्ते बांधणी आणि इतर कामं केली जात आहेत, त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा:
नीरजने रचला इतिहास, डायमंड लीग जिंकणारा नीरज पहिला भारतीय
‘धर्मवीर’ भेटीला येतायत नव्या रुपात, प्रसाद ओकने केली पोस्ट
मुंबई फेरीवाल्यांसाठी लवकरच नवे धोरण
चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ उत्तर लडाखमध्ये पँगाँग तलावावर पूल बांधत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी असणाऱ्या प्लॅनेट लॅब पीबीसीने उपग्रहांच्या माध्यमातून काढलेल्या फोटोंमध्ये पँगाँग तलावावरील पुलाचं बांधकाम सुरु असल्याचं दिसत असून या पुलाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चीनच्या पिपल्स लिब्रेशन आर्मीला मोठ्या आकाराची वाहने आणि फौजफाटा या तलावाच्या उत्तरेला आणि दक्षिणेला सहज पोहचवता येणार आहे. त्यात आता अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळही चीनने बांधकाम सुरु केल्याचं दिसून येत आहे.