उइगर मुसलमानांच्या प्रश्नावर जाता जाता ट्रम्पचा चीनला दणका

उइगर मुसलमानांच्या प्रश्नावर जाता जाता ट्रम्पचा चीनला दणका

“चीनमध्ये उइगर मुसलमानांचा नरसंहार सुरु आहे.” असे विधान माईक पॉम्पेओ यांनी केले. ट्रम्प यांचा कार्यकाळ संपत आला असतानाच पॉम्पेओ यांनी हा निर्णय घेतला आहे. “चीनच्या पश्चिम शिंजियांग भागात उइगर मुसलमानांचा नरसंहार सुरु आहे. तिथे अनेक ठिकाणी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने ‘री-एजुकेशन कॅम्प’ म्हणजेच छळछावण्या सुरु केल्या आहेत.” असे माईक पॉम्पेओ म्हणाले. नाझी जर्मनीच्या ज्यू नागरिकांकरता चालवलेल्या कॉन्सन्ट्रेशन कॅंप्स म्हणजेच छळछावण्या यांच्याशीही पॉम्पेओ यांनी शिंजियांगच्या छळछावण्यांशी तुलना केली.

अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने चीनवर या संदर्भात निर्बंध लादले आहेत. उइगर मुसलमानांचे दमन करण्यामागे चीनच्या कम्युनिस्ट पक्षातील सर्व जवाबदार व्यक्तींवर हे निर्बंध लादले जाणार आहेत. गेल्या वर्षीपासूनच ट्रम्प सरकारने चीनभोवती फास आवळायला सुरवात केली होतीच. त्याचाच शेवटचा अध्याय हा या निर्बंधांचा आहे. कोविड-१९ ला ट्रम्प यांनी सुरवातीपासूनच वूहान व्हायरस म्हणत होते. २०२० मध्येच चीनचे अनेक देशांशी खटके उडायला सुरवात झाली होती. यामध्ये भारत, तिबेट,भूतान व्हिएतनाम सारखे शेजारी देश तर होतेच, पण हॉंगकॉंगसारखे शहरसुद्धा होते. यातून ट्रम्पना चीनविरोधात फळी उभारण्यासाठी चांगली संधी मिळाली.

ट्रम्प सरकारच्या या शेवटच्या निर्णयामुळे आता नवीन बायडन सरकारलासुद्धा चीनशी संबंध सुधारणे अत्यंत कठीण जाणार आहे.

Exit mobile version