पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) २० महिन्यांपासून चीनच्या कुरापती सुरू असून आता पुन्हा एकदा चीनने भारताविरुद्ध चिथावणीखोर कृत्य केले आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्यावर आपला दावा सिद्ध करण्यासाठी अरुणाचल प्रदेशमधील तब्बल १५ ठिकाणांची नावे बदलली आहेत. चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने एका आदेशात म्हटले आहे की, १ जानेवारी २०२२ पासून चीनच्या नकाशांवर ही बदललेली नावे वापरात आणण्यास सांगितले आहे.
भारताने नेहमीच अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे. चीनच्या या कुरापतींना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने प्रत्युत्तर दिले आहे. ‘नाव बदलल्याने वस्तुस्थिती बदलत नाही,’ असे परराष्ट्र मंत्रालयाने चीनला ठणकावले आहे.
चीनच्या सरकारने अरुणाचल प्रदेशमधील आठ निवासी ठिकाणे, चार पर्वत, दोन नद्या आणि एक पर्वतीय खिंड अशा एकूण १५ ठिकाणांना चिनी भाषेत नावे देऊन या ठिकाणांना भारतीय भूभाग म्हणून मान्यता देण्यास नकार दिला आहे. चीनचे मुख्य प्रशासकीय प्राधिकरण स्टेट कौन्सिलने जारी केलेली ही नावे नियमांनुसार प्रमाणित असल्याचे म्हटले आहे.
यापूर्वीही चीनने एप्रिल २०१७ मध्ये भारताच्या ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न केला होता, त्यावर भारताने कठोर भूमिका घेत चीनच्या या कुरापतींना आळा घातला होता. आता पुन्हा तब्बल साडेचार वर्षांनंतर चीनने पुन्हा १५ ठिकाणांची नावे बदलण्याच्या नव्या कुरापती सुरू केल्या आहेत.
हे ही वाचा:
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचे वर्चस्व
श्रीनगरमधील चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार
मुंबई हाय अलर्टवर, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
महाराष्ट्राच्या महिला कडाडल्या तर पुरुषांमध्ये रेल्वे धडाडली
भारतीय लष्कर आणि चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीचे (PLA) सैनिक पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जवळपास २० महिन्यांपासून आमनेसामने आहेत. १५ जून २०२० रोजी, पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले आणि तेव्हा ही परिस्थिती अधिक चिघळली गेली. भारत आणि चीन यांच्यात लष्करी चर्चेच्या १३ फेऱ्या आणि २८ राजनैतिक चर्चा झाल्या आहेत, परंतु त्यावर अजूनही दोन्ही देशांकडून तोडगा काढण्यात आलेला नाही.