भारत आणि चीन यांच्यातील संबंधात दुरावा आहे हे खरे असले तरी पाकिस्तानने भारताकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असा सल्ला चक्क चीननेच दिला आहे. चीनच्या एका तज्ज्ञाने पाकिस्तानला भारताकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. भारताने गेल्या १० वर्षांत ज्या वेगाने विकास केला आहे, त्यावरून पाकिस्तानने शिकले पाहिजे, असे सल्ला त्यांनी दिला आहे.
भारताचे कौतुक करणारे हे तज्ज्ञ आहेत, बीजिंगमधील चायना इन्स्टिट्यूट ऑफ कंटेम्पररी इंटरनॅशनल रिलेशन्स (सीआयसीआयआर)च्या इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ एशियन स्टडिजचे संचालक हू शिशेंग. ‘भारताने गेल्या १० वर्षांत केलेल्या विकासाकडे जरा पाहा. भारताचा हा वेगवान विकास गुजरातच्या मॉडेलवर आधारित आहे. पाकिस्तान या प्रकारचा विकास का नाही करू शकला? या प्रकारच्या मॉडेलचा अवलंब करून विकास का नाही होऊ शकला?’, असे प्रश्न हू यांनी उपस्थित केले आहेत.
गेल्या महिन्यातच चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर योजनेची १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पासाठी चीनने पाकिस्तानात ६० अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पांतर्गत पाकिस्तानच्या दक्षिण पश्चिमस्थित ग्वादर बंदर चीनच्या शिनजियांग प्रांताशी जोडले जाईल. या संपूर्ण मार्गावर वाहतुकीच्या मार्गासह वीज संयत्र आणि उद्योगांची स्थापनाही करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
ईक्विप्ड सिनियर राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश
ताडदेव लूट तसेच वृद्धेच्या हत्येप्रकरणातील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या
डीआरडीओचे माजी महासंचालक डॉ. व्ही. एस. अरुणाचलम यांचे निधन
स्वातंत्र्यदिनानिमित्त पोस्ट केलेल्या पाक क्रिकेट संघाच्या व्हिडीओत इम्रानच होता गायब…
याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारताचे कौतुक केले होते. तसेच, पाकिस्तानने भारताकडून शिकले पाहिजे, असे कौतुकही केले होते. ‘आयटी उद्योगातील क्रांतीत भारताची कामगिरी थक्क करणारी आहे. २० वर्षांपूर्वी भारताचे स्थान कुठे होते? आणि आज भारत कुठे पोहोचला आहे आणि आपण कुठे आहोत? भारत आपल्या कितीतरी पुढे आहे. भारताने आयटी क्षेत्रात खूप प्रगती केली आहे,’ असे कौतुक इम्रान खान यांनी केले होते.