गेले अनेक महिने भारत आणि चीन यांच्यात गालवान खोऱ्यात सुरु असलेला संघर्ष काही दिवसांपूर्वी संपला. भारत सरकार आणि भारतीय सैन्य यांच्या कणखर भूमिकेमुळे चीनला अखेर माघार घ्यावी लागली. चीनला नमवण्याच्या भारताच्या पराक्रमाची साऱ्या जगात याची चर्चा सुरु असतानाच खुद्द चीननेही आता याची कबुली दिली आहे. गालवान खोऱ्यात चीनचे चार सैनिक मारले गेले असे वृत्त चीनच्या ग्लोबल टाईम्सने दिले आहे. ग्लोबल टाईम्स हे चीन सरकारच्या अधिपत्याखाली असलेले वर्तमानपत्र आहे.
ग्लोबल टाईम्सने बातमी देताना चीनचा भारत विरोधी अजेंडा रेटण्याचा प्रयत्न केला आहे. मे २०२० पासून सुरु असलेल्या भारत चीन संघर्षाची सुरुवात ही भारताच्या बाजूने झाली असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. भारताने कराराचे उल्लंघन केले आणि नंतर झालेल्या चकमकीत चायनाच्या सैनिक शूरपणे लढले असे ग्लोबल टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे. याच चकमकीत चीनच्या ४ सैनिकांना वीरगती आल्याचे ग्लोबल टाईम्सच्या बातमीत म्हटले आहे.
चीनने ग्लोबल टाईम्सला हाताशी धरून भारताने करार मोडल्याचा खोटा कांगावा करण्याचा प्रयत्न चालवला असला तरीही त्या नादात त्यांनी भारतीय जवानांच्या शौर्याची कबुली दिली आहे. पण हे करताना चीनने खरा आकडा उघड केला नाही. एका रशियन वृत्त संस्थेने काही दिवसांपूर्वी दिलेल्या बातमीनुसार गालवान खोऱ्यात चीनचे एकूण ४५ सैनिक मारले गेले आहेत.