बांगलादेशमधील परिस्थिती अधिक बिघडत चालली असून आता पंतप्रधानांच्यानंतर देशाचे सरन्यायाधीश यांनीही राजीनामा दिला आहे. बांगलादेशचे सरन्यायाधीश उबेदुल हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर विद्यार्थी संघटना आणि आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयासमोर जमण्यास सुरुवात केली. सरन्यायाधीशांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शुक्रवारी आणि शनिवारी निदर्शने अचानक तीव्र झाली, ज्यांना नव्याने स्थापन झालेल्या अंतरिम सरकारच्या अनेक नेत्यांचा पाठिंबा मिळाला. आंदोलनकर्त्यांनी सरन्यायाधीश उबेदुल हसन यांच्या राजीनाम्याची मागणी जोर लावून धरली होती. तसेच आंदोलकांनी शनिवारी मुख्य न्यायमूर्तींना दुपारी १ वाजेपर्यंत राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला होता आणि तसे न केल्यास न्यायाधीशांच्या निवासस्थानाचा घेराव करण्याचा इशारा दिला होता. यानंतर हसन यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलात पत्रकारांशी बोलताना न्यायमूर्ती हसन म्हणाले की, “वकिलांच्या सुरक्षेचा विचार करून मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. राजीनाम्यासाठी काही औपचारिकता आहेत. त्यांची पूर्तता केल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्याकडे राजीनामा पाठवणार आहे.”
हे ही वाचा..
जरांगेंच्या आंदोलनामागून पवार, ठाकरे माथी भडकवतात!
भारतात आश्रय मिळविण्यासाठी बांगलादेशच्या सीमेवर हिंदू पाण्यात उभे
बांगलादेशी हिंदू ढाक्याच्या रस्त्यावर !
“माझ्या आईचे प्राण वाचवल्याबद्दल भारतासाठी कृतज्ञ”
उबेदुल हसन हे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. बांगलादेशचे २४ वे सरन्यायाधीश बनलेल्या हसन यांच्याकडे शेख हसीनाचे विश्वासू म्हणून पाहिले जात होते. उबेदुल हसन हा बांगलादेशच्या न्यायव्यवस्थेचाही प्रसिद्ध चेहरा आहे. १९८६ मध्ये जिल्हा न्यायालयात वकील म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून, उबेदुल हसन यांनी हाँगकाँग, सिंगापूर, नेदरलँड आणि अर्जेंटिना यासह विविध देशांतील अनेक आंतरराष्ट्रीय कायदेशीर परिषदांमध्ये भाग घेतला होता. हसन यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.