पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गुरुवारी लंडनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या केलॉग कॉलेजमध्ये त्यांचे पहिले भाषण देताना डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी आंदोलकांनी आव्हान दिले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) अर्थात CPI(M)च्या स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI)च्या यूके युनिटशी संबंधित काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान पोस्टर्स घेऊन उपस्थिती लावली.
विद्यार्थ्यांनी २०२३ च्या पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचार, तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर कथित बलात्कार, तसेच २०१२ मध्ये ममता बॅनर्जी यांनी बलात्कारांविषयी केलेल्या विधानावर प्रश्न विचारले. त्या वक्तव्यात त्यांनी म्हटले होते की, “आजकाल स्त्रिया आणि पुरुष अधिक मुक्तपणे वागतात, जसे की मुक्त बाजार आहे. मात्र, आंदोलकांच्या विरोधानंतर ममता बॅनर्जींनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांचे आरोप ऐकून घेतले. त्या म्हणाल्या, “तुम्ही माझे स्वागत करत आहात, धन्यवाद. मी तुम्हाला मिठाई खाऊ घालेन.”
जेव्हा विद्यार्थ्यांनी आरजी कर बलात्कार प्रकरणावर प्रश्न विचारले, तेव्हा त्या म्हणाल्या, “कृपया तुमचा आवाज उठवा. हे लोकशाही आहे. मी ऐकेन, मी काळजीपूर्वक ऐकेन. प्रकरणाची माहिती देताना बॅनर्जी म्हणाल्या की, “हे प्रकरण सध्या न्यायालयात असून केंद्र सरकारने तपास ताब्यात घेतला आहे. राज्य सरकारचा यात काहीही सहभाग नाही. कृपया येथे राजकारण करू नका.
एका विद्यार्थ्याने आरोप केला की, “तृणमूल नेत्याने आमच्या बोटं तोडण्याची धमकी दिली.” त्यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “तुम्ही खोटं बोलत आहात. आंदोलकाला “भाऊ” संबोधून त्या म्हणाल्या, “हे करू नकोस. मला तुमच्याबद्दल विशेष आत्मियता आहे. आम्ही सगळ्यांना प्रेम करतो. कृपया हे राजकीय मंच बनवू नका. जर राजकारण करायचे असेल, तर बंगालमध्ये जा आणि तुमच्या पक्षाला मजबूत करा. माझ्याशी भांडू नका.”
यानंतर, १९९० मधील एक कृष्णधवल छायाचित्र त्यांनी दाखवले, ज्यामध्ये त्या एका हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या दिसतात. हा हल्ला CPI(M)च्या युवा कार्यकर्त्या ललू आलम यांनी केल्याचा आरोप होता. मात्र, २०१९ मध्ये पुराव्याअभावी ललू आलम निर्दोष सुटले. “माझा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. हीच तुमची क्रूरता आहे,” असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी डाव्यांवर निशाणा साधला.
त्या पुढे म्हणाल्या, “हे काही नाटक नाही. तुम्ही माझा अपमान करत नाही, तर तुमच्या संस्थेचा अपमान करत आहात. मला अपमानित कराल, पण संस्थेला करू नका. त्या म्हणाल्या की, “डाव्यांची हीच सवय आहे, जिकडे मी जाईन तिकडे गोंधळ घालायचा.” त्या पुढे म्हणाल्या, “तुमच्या नेत्यांनी परदेशात दौरा केला, तर हेच घडू शकते.”
बॅनर्जी यांनी धर्मसामंजस्यावर भर देत सांगितले की, “मी हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिस्ती सगळ्यांसाठी आहे. मी ऐक्याचा समर्थक आहे. पण तुम्ही नाही. त्या पुढे म्हणाल्या, “तुम्ही मला अधिक बळकट करता. दीदी दरवेळी येईल. दीदी कुणालाही घाबरत नाही. दिदी रॉयल बंगाल टायगरसारखी वावरते. मला अडवायचं असेल, तर अडवा!”
तृणमूल काँग्रेसनेही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत लिहिले: “ती डगमगत नाही. ती मागे हटत नाही. जितका विरोध होईल, तितकी ती अधिक जोरात गर्जना करेल. @MamataOfficial ही खऱ्या अर्थाने रॉयल बंगाल टायगर आहे!”
हे ही वाचा:
आरोग्यासाठी वरदान: जांभळाच्या बियांचे चूर्ण
म्यानमार आणि बँकॉकला भूकंपाचा धक्का, भारताकडून मदतीचे आश्वासन!
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निकोलस पूरन आघाडीवर
अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल!
बंगालची बदनामी करणारी मुख्यमंत्री
भाजपा नेते अमित मालवीय यांनी भाषणावेळी आंदोलकांनी धरलेल्या पोस्टर्सचे फोटो शेअर करत लिहिले, “ती पश्चिम बंगालसाठी लज्जास्पद आहे. हिंदू बंगाली समाज तिला मुख्यमंत्रीपदावर पाहू इच्छित नाही. भाजपा नेते संजय जयस्वाल यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर “भारतविरोधी अजेंडा घेऊन परदेशी गेल्या” असा आरोप केला.
ते म्हणाले, “राहुल गांधींसारख्याच ममता बॅनर्जी यांनीही परदेशात भारतविरोधी अजेंडा राबवला. त्यांचे राजकारण हे बांगलादेशी घुसखोरांना भारतात आणण्यावर आणि त्यांना आधार कार्ड मिळवून देण्यावर चालते. त्यांनी दाखवून दिले की त्या भारतविरोधी आहेत.”